निमगाव केतकी (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या निमगाव केतकीच्या मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण दशरथ डोंगरे हे बारा विरुद्ध पाच मतांनी विजयी झाले.
उपसपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सचिन दत्तात्रेय चांदणे हे अकरा विरुद्ध सहा मताने विजयी झाले.
निमगाव केतकीचे सर्वात तरुण सरपंच होण्याचा बहुमान प्रवीण डोंगरे यांना मिळाला आहे. तसेच, वडिल व मुलगा गावचे सरपंच होण्याचा मानही डोंगरे कुटुंबाला मिळाला आहे. प्रवीण यांचे वडिल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सुवर्णयुग पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे हे 2006 मध्ये पाच वर्षे निमगाव केतकीचे सरपंच होते.
ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी रांखुडे यांनी आज निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली. सरपंचपदासाठी प्रवीण डोंगरे यांना बारा मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील भाजपच्या रिना सुभाष भोंग यांना पाच मते मिळाली. उपसरपंचपदासाठी पहिलवान सचिन चांदणे यांना अकरा मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील अर्चना अनिल भोंग यांना सहा मते मिळाली.
नूतन सरपंच व उपसरपंच यांचा अनेक संस्था व मंडळांनी सत्कार केला. आमदारकीला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना लीड देणाऱ्या व ग्रामपंचायत विरोधात देणाऱ्या येथील निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. दशरथ डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली व दतात्रेय शेंडे, मच्छिंद्र चांदणे, संदीप भोंग या प्रचार प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सतरा पैकी बारा जागा जिंकत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे.
सर्वांना विश्वासात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून गावचा भरीव विकास करू, अशी प्रतिक्रिया नूतन सरपंच प्रवीण डोंगरे व उपसरपंच सचिन चांदणे यांनी दिली.

