इंदापूरच्या निमसाखरमध्ये राष्ट्रवादी-भाजप युती : सरपंच राष्ट्रवादीचा, तर उपसरपंच भाजपकडे  - NCP-BJP alliance in Indapur's Nimsakhar: Sarpanch to NCP, while Deputy Sarpanch to BJP | Politics Marathi News - Sarkarnama

इंदापूरच्या निमसाखरमध्ये राष्ट्रवादी-भाजप युती : सरपंच राष्ट्रवादीचा, तर उपसरपंच भाजपकडे 

राजकुमार थोरात 
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात काट्याची लढाई पहायला मिळते.

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुका हा राज्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात काट्याची लढाई पहायला मिळते. मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तालुक्‍यातील निमसाखर ग्रामपंचायतीची सत्ता वाटून घेतली आहे. यामध्ये सरपंचपद राष्ट्रवादीकडे, तर उपसरपंचपद भाजपकडे गेले आहे. 

भाजप-राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत गावच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध केली आहे. त्यानुसार सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धैर्यशील विजयसिंह रणवरे, तर उपसरपंचपदी भाजपच्या विद्यादेवी सुनील रणवरे यांची वर्णी लागली. 

निमसाखर गावामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन गट आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या एका गटाचे चार व दुसऱ्या गटाचे दोन उमेदवार निवडून आले होते. भाजपचे एका गटाचे चार, तर दुसऱ्या गटाचे दोन उमेदवार निवडून आले होते. एका जागेवर एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष ग्रामपंचायत सदस्याला महत्व आले होते. मात्र, राष्ट्रवादी-भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला युती करण्याचा निर्णय घेतला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील आणि भाजपचे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रणजित पाटील यांच्यामध्ये समझोता झाला. त्यामुळे गावपातळीवर राष्ट्रवादी व भाजपची युती झाल्याने राष्ट्रवादीचा सरपंच व भाजपचा उपसरपंच झाला आहे. 

निवडीच्या वेळी विजयसिंह निंबाळकर, रणजित रणवरे, भगवानराव रणसिंग, अभिजित पाटील, नंदकुमार रणवरे, वीरसिंह रणसिंग, रामभाऊ रणसिंग, अनिल रणवरे, दिलीप माने उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच निवडीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी विजय ढवाण, ग्रामसेवक सुधाकर भिलारे, तलाठी महादेव खारतोडे यांनी काम पाहिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख