राष्ट्रवादीची उमेदवारी अखेर भगिरथ भालकेंनाच : समाधान आवताडेंशी रंगणार सामना 

पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार हा जनतेच्या मनातील असेल, असे सूतोवाच केले होते.
NCP announces Bhagirath Bhalke's candidature in Pandharpur constituency
NCP announces Bhagirath Bhalke's candidature in Pandharpur constituency

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी शब्द पाळत अखेर (स्व.) भारत भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरून याबाबतची घोषणा करत पोटनिवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भालके कुटुंबीयांबरोबर काही राजकीय निरीक्षकांनी पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आणले होते. पवार कुटुंबीयांनी पार्थ पवार यांच्या नावाचा कुठे संबंध येऊ दिला नाही, त्यामुळे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार भगिरथ भालके की त्यांच्या मातोश्री जयश्री भालके या दोघांपैकी कोण? याची उत्सुकता होती. 

दरम्यान, पंढरपूरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी निवडीवरून झालेल्या राजकीय गोंधळ शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच पंढरपूरचा दौरा केला होता. त्यांनी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार हा जनतेच्या मनातील असेल, असे सूतोवाच केले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल धनगर समाजामध्ये असलेला रोष शांत करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीदेखील या मतदारसंघात भालके यांच्याबद्दल सहानुभूती असल्यामुळे धनगर समाजातील इच्छुक तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. आपल्या काही अडचणी असतील, तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते, त्यामुळे भगीरथ भालके यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. त्याच अनुषंगाने भगिरथ भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आपण उमेदवार असून स्वर्गीय. भारतनाना भालकेंचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयी करा, असे आवाहन करत आहेत. 

भारतीय जनता पक्षाकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनही आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे या आखाड्यामध्ये किती उमेदवार उरतात, यापेक्षा भालके आणि आवताडे या दोघांमध्ये होणाऱ्या दुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (मंगळवारी, ता. 30 मार्च) पंढरी नगरीत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते येत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com