गेल्या वर्षी हुकलेली संधी अशोक पवार यंदा आबाराजे मांढरेंना देणार काय?  - Names of Vasantrao Korekar, Abaraje Mandhare and Vishwas Dhamdhere are discussed for the post of Shirur Bazar Samiti sabhapati. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

गेल्या वर्षी हुकलेली संधी अशोक पवार यंदा आबाराजे मांढरेंना देणार काय? 

नितीन बारवकर
शुक्रवार, 2 जुलै 2021

तरीही संयमी व संवेदनशीलपणे त्यांनी या निर्णयाचा स्वीकार केला.
 

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर वर्णी लावण्यासाठी अनेक दिग्गज संचालकांनी कंबर कसली आहे. ‘आपणच या पदासाठी कसे योग्य आहोत' हे वरिष्ठांच्या मनावर ठसविण्यासाठी अनेकांनी आपापल्या परीने ‘फिल्डिंग' लावली आहे. बाजार समितीचा कार्यकाल वर्षभराने संपत असल्याने वर्षभरात एकाऐवजी दोघांना सभापतिपदाची संधी देऊन स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न नेतेमंडळीकडून होण्याची शक्‍यता आहे. (Names of Vasantrao Korekar, Abaraje Mandhare and Vishwas Dhamdhere are discussed for the post of Shirur Bazar Samiti sabhapati.)

शंकर जांभळकर यांनी आपल्या सभापतिपदाच्या गेल्या वर्षभराच्या काळात अत्यंत वेगवान व रचनात्मक कामकाज करून, नुकताच पदाचा राजीनामा दिला. इतर संचालकांनाही सभापतिपदाची संधी मिळावी, म्हणून जांभळकर यांनी राजीनामा दिला. नवीन सभापती निवडीसाठी 10 जुलैला बाजार समितीच्या संचालक मंडळाची विशेष सभा होणार आहे. या सभेत सभापतिपदी कुणाची निवड होणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा : जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई झाली अन् अजित पवार म्हणाले...

शिरूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. सभापतिपदी पक्षाच्याच संचालकाची निवड होणार, हे वादातीत असले; तरी अंतर्गत मतभेदातून किंवा वर्चस्ववादातून ‘काही वेगळे’ घडू नये म्हणून नेतेमंडळींकडूनही सावध पवित्रा घेतला जात असल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 18 पैकी 14 जागा जिंकून राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले होते. भाजप पुरस्कृत पॅनेलचे राहुल गवारे, संतोष मोरे, विकास शिवले व छाया बेनके निवडून आले होते. मात्र, शिवले व बेनके यांनीही कालांतराने राष्ट्रवादीची वाट धरल्याने आता गवारे व मोरे हे दोघेच विरोधात आहेत. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत वेगळ्या काही हालचाली होण्याची सूतराम शक्‍यता नाही. तरीही राष्ट्रवादीअंतर्गत एकापेक्षा अधिक इच्छुकांची संख्या नेतेमंडळींची डोकेदुखी ठरू पाहत आहे. 

शिरूर तालुक्‍यातील 39 गावे, आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेली असल्याने निर्णय प्रक्रियेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सहभाग महत्वपूर्ण असतो. आमदार ऍड. अशोक पवार यांच्यावर अंतिम निर्णय अवलंबून असला तरी शिरूर-आंबेगाव असा समन्वय साधताना दोन्ही नेत्यांना कसरत करावी लागते.

बाजार समितीचे पदाधिकारी निवडताना सुरवातीला शशिकांत दसगुडे यांना सभापतिपदाची संधी दिल्यानंतर इतर इच्छुकांच्या चढलेल्या पाऱ्याचा प्रत्यय नेतेमंडळींना आला होता. आंबेगाव विधानसभेला जोडलेल्या भागातून निवडून आलेल्या संचालकांची त्यावेळी सभात्याग करण्यापर्यंत मजल गेली होती. तीन वर्षांनंतर नवीन सभापती निवडताना जांभळकर यांच्या रूपाने आंबेगावला प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यामुळे, त्यानुसार या वेळी शिरूर मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळणार हे स्पष्ट आहे. तरी सभापतिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. 

ज्येष्ठत्वाच्या निकषानुसार ऍड. वसंतराव कोरेकर यांचे नाव अग्रभागी असले; तरी महत्वाकांक्षी उभरते नेतृत्व म्हणून धैर्यशील उर्फ आबाराजे मांढरे यांच्या नावाचा डंका सर्वाधिक आहे. गतवेळीही त्यांनी पूर्ण तयारी केली होती. तथापि, सभापतिपद आंबेगाव मतदार संघाला देण्याचा निर्णय झाल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फेरले गेले. तरीही संयमी व संवेदनशीलपणे त्यांनी या निर्णयाचा स्वीकार करून आपली प्रबळ इच्छा दाबली. त्यामुळे यावेळी त्यांच्या नावालाच नेतेमंडळींकडून हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्‍यता आहे. 

वर्षभरात प्रत्येकी सहा महिन्याचा कालावधीसाठी दोघांनाही संधी देऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. असे झाले; तरी सुरुवातीला कुणाला संधी मिळणार, यावरूनही संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे. ऍड. कोरेकर व मांढरे यांनी पक्के नियोजन केले असतानाच माजी उपसभापती विश्‍वास ढमढेरे यांनीही सभापतिपदाची तीव्र अपेक्षा व्यक्त केल्याने आणि समर्थकांमार्फत नेतेमंडळींपर्यंत आपले म्हणणे पोचते केल्याने सभापतिपदासाठी सध्यातरी तिरंगी स्पर्धा दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख