चालत्या दुचाकीवर चाकूने वार करून कोतवालाचा खून 

या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रमजान यांचा मृत्यू झाला.
Murder of Kotwal in Khed taluka by stabbing
Murder of Kotwal in Khed taluka by stabbing

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड तालुक्यातील किवळे गावच्या कोतवालाचा चालत्या दुचाकीवर चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. ११ सप्टेंबर) संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. रमजान आदमभाई शेख (वय ४२, रा. किवळे, ता. खेड) असे खून झालेल्या कोतवालाचे नाव आहे. या प्रकरणी रफिक पमा शेख (रा. अहिरे, ता. खेड) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Murder of Kotwal in Khed taluka by stabbing)

खेडचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळ्याचे कोतवाल रमजान शेख आणि रफिक पमा शेख (रा. अहिरे, ता. खेड) हे आते-मामे भाऊ होते. ते शनिवारी पाईट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी अज्ञात कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर रमजान शेख यांनी फोन करून चंद्रकांत सुदाम शिवले (रा. किवळे, ता. खेड) यांना, ‘आमचे मिटले आहे, तुम्ही दुचाकी घेऊन मला घ्यायला हॉटेलवर या', असे सांगितले. 

शिवले आणि रमजान शेख यांना चांदूस येथे जमीन पाहावयास जायचे होते. दुचाकीवर शिवलेंच्या मागे रमजान बसले होते. त्यावेळी मीही येतो म्हणत, रफिक शेखही रमजान शेख यांच्या मागे ट्रीपलसीट बसला. दुचाकी चांदूसकडे जात असताना रफिक याने मागून कोतवाल रमजान शेख यांच्या मानेवर चाकूने वार केले आणि दुचाकीवरुन उडी मारून तो पळून गेला. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रमजान यांचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी चंद्रकांत शिवले यांनी फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला. साहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com