वयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये : कोल्हेंची आढळरावांवर बोचरी टीका   - MP Amol Kolhe criticizes former MP Shivajirao Adhalrao Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

वयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये : कोल्हेंची आढळरावांवर बोचरी टीका  

रवींद्र पाटे
शनिवार, 17 जुलै 2021

पद गेल्यानंतर  शिरूरचे माजी खासदार व जुन्नरचे माजी आमदार वैफल्यग्रस्त व अस्वस्थ झाले आहेत.  

नारायणगाव (जि. पुणे) : माजी खासदारांविषयी मला आदर आहे. नारायणगाव व खेड बाह्यवळण उदघाटन कार्यक्रमाचे मी त्यांना निमंत्रण देणार होतो. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन करून या कार्यक्रमाला राजकीय रंग दिला. वयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली. (MP Amol Kolhe criticizes former MP Shivajirao Adhalrao Patil)

नारायणगाव व खेड बाह्यवळ रस्त्याचे उदघाटन शनिवारी (ता. १७ जुलै) करण्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी जाहीर केले होते. मात्र, त्या पूर्वीच शुक्रवारी (ता. १६ जुलै) सायंकाळी बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले होते. त्या वेळी माजी खासदार आढळराव पाटील व माजी आमदार शरद सोनवणे यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर टीका केली होती. 

हेही वाचा : या कारणामुळे राज्यात सध्या तरी राजकीय उलथापालथ होणार नाही : चंद्रकांत पाटील

पूर्व नियोजनानुसार आज (ता. १७ जुलै) खासदार डॉ. कोल्हे यांच्या उपस्थितीत बाह्यवळण रस्त्याचे उदघाटन प्रकल्पग्रस्त शेतकरी बाळासाहेब पाटे यांच्या हस्ते पुन्हा करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. कोल्हे यांनी माजी खासदार आढळराव व माजी आमदार सोनवणे यांच्यावर सडकून टीका केली. 

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, लोकप्रतिनिधी हा राजा नसून जनतेचा सेवक आहे. माजी खासदार आढळराव पाटील पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी होते. या कालावधीत त्यांना महामार्गाचे व सात बाह्यवळ रस्त्यांचे काम व चाकण उड्डाण पुलाचे काम पूर्ण करता आले नाही. आम्हाला चोर म्हणणाऱ्या जुन्नरच्या माजी आमदाराच्या त्रासाला कंटाळून ठेकेदार पळून गेला. त्यांनी बीएमडब्ल्यू गाडी घेतल्याची चर्चा आहे. बाह्यवळण रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मी पाठपुरावा केला. पद गेल्यानंतर  शिरूरचे माजी खासदार व जुन्नरचे माजी आमदार वैफल्यग्रस्त व अस्वस्थ झाले आहेत.  

आमदार अतुल बेनके म्हणाले, राजकीय खुर्ची सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे. शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे प्रश्न सोडवले जातील. शेतकऱ्यांचे समाधान होईल या पद्धतीने नियोजित लोहमार्गासाठी भूसंपादन केले जाईल. 

माजी आमदार सोनवणे यांच्यावर टीका करताना सभापती संजय काळे म्हणाले, ‘‘आम्हाला चोर म्हणणारे सोनवणे दलाल होते. शेतकऱ्यांचे डाग व वजने कापून ते मोठे झाले आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून ठेकेदार पळून गेला. त्यांनी बीएमडब्ल्यू गाडी कोठून घेतली. सोनवणे माजी झाले म्हणून नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले. पराभव झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते. या वेळी सभापती  संजय काळे, अनिल मेहेर, रमेश भुजबळ, गणपतराव फुलवडे, पांडुरंग पवार, धोंडिभाऊ पिंगट, आशा बुचके, राजश्री बोरकर, शरद लेंडे, भाऊ देवाडे, मोहित ढमाले, तहसीलदार हनुमंत कोळेकर, दिलीपराव मेदगे,  दिलीप कोल्हे, राजेश गावडे, अशोक घोडके,अनंतराव चौगुले, गणेश वाजगे, राजेंद्र मेहेर, ,तानाजी डेरे, संतोष खैरे, विकास दरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, गणपतराव फुलवडे,  पांडुरंग पवार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन भाऊ देवाडे, मुकेश वाजगे यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख