शिवाजीदादा, माझ्या बंधूने वापरलेल्या भाषेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो 

सागर रामसिंग कोल्हे यांनीकेलेल्या टिकेचे शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्‍यात शुक्रवारी (ता.12 मार्च) तीव्र पडसाद उमटले.
MP Amol Kolhe apologized for the language used by his brother regarding Shivajirao Adhalrao
MP Amol Kolhe apologized for the language used by his brother regarding Shivajirao Adhalrao

मंचर (जि. पुणे) : ''आदरणीय शिवाजीदादा, आपल्याबाबत माझ्या बंधूंकडून जी भाषा समाज माध्यमात वापरली गेली. त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. तीन टर्म खासदार राहिलेल्या आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीबाबत अशी भाषा वापरणे योग्य नाही, हे मी जाणतो. संबंधित पोस्ट डिलीट करण्याची सूचना मी दिलेली आहे,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भावाने केलेल्या चुकीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांनी शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर शिवराळ भाषेत पोस्ट केल्या होत्या. त्या टिकेचे शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्‍यात शुक्रवारी (ता.12 मार्च) तीव्र पडसाद उमटले. सागर कोल्हे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत शिवसैनिकांनी खासदार डॉ. कोल्हे यांचा निषेध केला. शिवसैनिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार कोल्हे यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त केली. 

आंबेगावात निषेध 

आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने मंचर येथे खासदार कोल्हे व सागर कोल्हे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सागर कोल्हेंना अटक करण्याची मागणी करत मंचरचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांना निवेदन दिले. 

शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश भोर, शिवसेना जिल्हा सल्लागार रवींद्र करंजखेले, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, मंचरच्या सरपंच किरण राजगुरू, माजी सरपंच दत्ता गांजाळे, सागर काजळे, कल्पेश बाणखेले, अशोक थोरात, अजित चव्हाण, सतीश बाणखेले, अरुण बाणखेले आदी या वेळी उपस्थित होते. 

जुन्नरमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी 

जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव येथे माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे बंधूंचा निषेध करत नारायणगाव पोलिसांकडे सागर कोल्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. 

या वेळी जुन्नरचे नगराध्यक्ष श्‍याम पांडे, जिल्हा सल्लागार संभाजीराव तांबे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, सरपंच महेश शेळके, उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, चंद्रकांत डोके व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

शिरूरला सागर कोल्हेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन 

शिवसेना शिरूर तालुका व शिरूर शहराच्या वतीने सागर कोल्हे यांच्या प्रतिमेस नगर परिषदेसमोर शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केले.

या वेळी शिवसेना जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, नगरसेवक संजय देशमुख, शिरूर शहरप्रमुख मयूर थोरात, हितेश शहा, संतोष पवार, लाला लोखंडे, निखिल केदारी, पप्पू गव्हाणे, गोरक्ष करंजुले, मनोज भगत आदी उपस्थित होते 

आढळरावांच्या गावांत जोरदार घोषणाबाजी 

माजी खासदार आढळराव पाटील यांचे लांडेवाडी गावात कोल्हे बंधूंचा निषेध करत आंदोलन केले. या वेळी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सरपंच अंकुश लांडे, माजी उपसरपंच तानाजी शेवाळे, जानकू पानसरे, माजी सरपंच रामदास आढळराव, शाखाप्रमुख विकास निसाळ, खंडेराव आढळराव, अशोक गव्हाणे, श्‍याम गुंजाळ, सुभाष लांडे, धनेश शेवाळे, गणेश शेवाळे, अंकुश शेवाळे, दत्ता तळपे, जालिंदर शेवाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान, भावाने शिवराळ भाषेत केलेल्या पोस्टबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com