मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल-डिझेल महागले  - Modi's wrong policies make petrol-diesel expensive : Ratnakar Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल-डिझेल महागले 

जनार्दन दांडगे 
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

या कायद्याच्या आडून मोठ्या खासगी कंपन्या शेतीत उतरणार असल्याने, छोटे-मोठे शेतकरी मोठ्या कंपनीचे गुलाम होतील.

उरुळी कांचन (जि. पुणे) : केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, आंदोलनकर्त्यांची दखलही केंद्र सरकारने घेतलेली नाही. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. कृषी कायद्यांवरुन कॉंग्रेस शेतकऱ्यांबरोबर आहे. शेतकरी तसेच कामगार देशोधडीला लावणारे हे कायदे त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे राज्याचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शनिवारी (ता. 20 फेब्रुवारी) केली. 

केंद्र सरकारच्या कृषि विरोधी कायद्याच्या निषेधार्थ जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली यवत ते उरुळी कांचन दरम्यान ट्रॅक्‍टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत शंभरहून अधिक ट्रॅक्‍टर सहभागी झाले होते. त्यावेळी महाजन यांनी वरील मागणी केली. रॅलीत सहभागी झालेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. 

या वेळी माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार संजय जगताप, अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारणी सदस्य देविदास भन्साळी, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा सीमा सावंत, सत्यशील शेरकर, संग्राम मोहोळ, पृथ्वीराज पाटील, लहूअण्णा निभूते, महेश ढमढेरे, दौंड तालुकाध्यक्ष विठ्ठल खराडे, कौस्तुभ गुजर, नंदकुमार चौधरी, विठ्ठल दोरघे, वंदना सातपुते आदी उपस्थित होते. 

महाजन म्हणाले, केंद्र सरकारने लादलेले तीनही कायदे हे अन्यायकारक असल्याने देशातील देशोधडीला लागणार आहेत. या कायद्याच्या आडून मोठ्या खासगी कंपन्या शेतीत उतरणार असल्याने, छोटे-मोठे शेतकरी मोठ्या कंपनीचे गुलाम होतील. मागील सहा वर्षांच्या काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

महागाईमुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी केंद्र सरकार शेतकऱ्यांना बदनाम कसे करता येईल, याकडे लक्ष देत आहेत. कॉंग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला असून या ही वेळी पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. 

आमदार संजय जगताप म्हणाले, केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. शेतकरी रस्त्यावर येऊन व्यापारीवर्गाच्या अधिकारात वाढ होणार आहे, म्हणून ही विधेयके तत्काळ मागे घ्यावीत, या मागणीसाठी कॉंग्रेसच्या वतीने देशभरात आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांचा एक भाग म्हणून यवत ते उरुळी कांचन रॅली काढण्यात आलेली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख