दिलीप सोपल यांची पवार कुटुंबातील व्यक्तीने वर्षभरानंतर घेतली भेट 

सोपल-पवार भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
MLA Rohit Pawar met Former Minister Dilip Sopal
MLA Rohit Pawar met Former Minister Dilip Sopal

बार्शी (जि. सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत नव्याने राजकीय मांडणी करत पक्षापासून दुरावलेले जुने नेते, कार्यकर्ते पुन्हा पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

पवार घराण्यातील युवा आमदार रोहित पवार यांनी पदवीधर प्रचाराच्यानिमित्ताने शरद पवार यांचे जुने सहकारी, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत गेलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून सोपलांना पवार कुटुंबातील कोणीही भेटले नव्हते. मात्र, रोहित पवार त्यांना भेटल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. 

या भेटीच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी बार्शीकरांना राजकारणाची नवी दिशा पुन्हा दाखवून दिली आहे. सोपल-पवार भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पवार-सोपल यांची झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे . 

राष्ट्रवादी कॉंग्रेसशी विशेषतः पवारांवर निष्ठा ठेवणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी माझा पक्ष "श' पक्ष असे म्हणत तालुक्‍यात गेली 35 वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारण केले. त्यांना पक्षाने मंत्रिपद, सोलापूरचे पालकमंत्रीपदही दिले होते. पण, मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपची राजकीय हवा पाहून त्यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ बाजूला ठेवून शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. 

विधानसभा निवडणुकीवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निरंजन भूमकर यांच्यासाठी बार्शीत सभा घेत आपल्या जुन्या सहकाऱ्यावर कडाडून प्रहार केला होता. त्यामुळे पवार-सोपल यांच्या नात्यामध्ये काहीसी शिथिलता आली होती. त्यामुळेच बहुधा विधानसभा निवडणुकीनंतर मागील वर्षभरात पवार कुटुंबातील कोणीही सोपल यांच्याशी संपर्क साधला नसल्याचे दिसते. पण, पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार बार्शीमध्ये येताच त्यांनी सोपल यांची भेट घेऊन त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे. 

माजी मंत्री सोपल यांचे पवार कुटुंबीयांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असोत किंवा अजितदादा निवडणुकीच्या वेळी सोपल यांच्या बंगल्यावर मुक्काम होऊन राजकारणाची दिशा ठरवली जात असे, हे बार्शीकर विसरणार नाहीत. 

नातं जपण्यासाठी राजकारण असलं पाहिजे, असं नाही, विचार घेऊन पुढे जायचे असते. पवारांचा वारसदार जनता ठरवत असते, व्यक्ती ठरवत नाहीत. सोपल हे पवारांचे जुने सहकारी असून अनेक वर्षे पक्षात काम केले आहे; म्हणून सोपल यांची भेट घेतली. 

-रोहित पवार, आमदार 
 
आमदार रोहित पवार भेटण्यासाठी आले होते. प्रकृतीची तसेच पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी पाठिंबा असावा, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी चर्चा झाली. बाकी राजकीय काही चर्चा झालेली नाही. 

-दिलीप सोपल, माजी मंत्री 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com