राहुल कुल-गणेश थोरात यांच्यातील संवादाचे कार्यकर्त्यांना आकर्षण 

या वेळी दोघांमध्ये बराच वेळ गप्पा सुरू होत्या.
MLA Rahul Kul a discussion with Ganesh Thorat
MLA Rahul Kul a discussion with Ganesh Thorat

केडगाव (जि. पुणे) : कट्टर विरोधक, भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनातून लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देणारे माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र गणेश थोरात यांनी पुन्हा एकदा कुल यांच्याशी गप्पांचा फड रंगवला. पदवीधर मतदानाच्या निमित्ताने कुल आणि थोरात हे आज (ता. 1 डिसेंबर) दौंड तालुक्‍यातील केडगाव मतदान केंद्राबाहेर चहाचा आस्वाद घेत एकमेकांची विचारपूस करत विविध विषयांवर संवाद साधला. 

कुल- थोरात यांच्यातील या अनपेक्षित संवादाची भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी आज (ता. 1 डिसेंबर) अत्यंत चुरशीने मतदान झाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने या निवडणुकीत प्रथमच लक्ष घातल्याने चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे मतदानातही चुरस दिसून आली. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते या मतदान प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. दौंडचे आमदार राहुल कुल, रमेश थोरात, त्यांचे सुपुत्र गणेश थोरात व अन्य पदाधिकारी मतदार केंद्रांना भेटी देत किती मतदान झाले, प्रक्रिया कशी सुरू आहे, काय अडथळे आहेत का?, याबाबतची माहिती घेत होते. 

आमदार कुल व गणेश थोरात यांची योगायोगाने केडगाव येथील मतदान केंद्रावर भेट झाली. गणेश थोरात यांना कुल यांनी चहा घेण्याची विनंती केली. आमदारांची विनंती मान्य करत थोरात हे कुल यांच्यासमवेत भाजपच्या बूथमध्ये जाऊन बसले. या वेळी दोघांमध्ये बराच वेळ गप्पा सुरू होत्या. काय चर्चा चालू आहे, हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते कान देऊन ऐकत होते. दोघांमध्ये कौटुंबीक आणि आरोग्यविषयक चर्चा झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. 

दरम्यान, राहुल कुल आणि गणेश थोरात यांच्यात कायम संवाद राहिलेला आहे. एका लग्न समारंभात आमदार कुल यांनी गणेश थोरात यांना फेटा बांधला होता. तसेच, कुल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा गणेश थोरातांनी कुलांना दिल्या होत्या. 

राहुल कुल आणि गणेश थोरात यांच्यातील या राजकारणविरहीत घडामोडींची त्या त्या वेळी सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. त्याचा आज पुन्हा एकदा तालुक्‍याला अनुभव आला. गावपातळीवरील कार्यकर्त्यांनीसुद्धा निवडणुकीपुरते राजकारण करत इतरवेळी एकमेकांमध्ये कायम संवाद ठेवावा, असा संदेश या दोघांनी दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com