MLA Babandada Shinde should agitate against unjust decision on Solapur regarding water sharing of Ujani
MLA Babandada Shinde should agitate against unjust decision on Solapur regarding water sharing of Ujani

उजनीचे पाणी पेटले : त्या निर्णयाविरोधात आमदार बबनदादा शिंदेंनी आंदोलन उभारावे 

इंदापूर भागातील गावांसाठी नव्याने पाच टीएमसी म्हणजे सीना माढा उपसा सिंचन योजनेपेक्षा अधिक पाणी घेऊन चालले आहे, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.

मोडनिंब (जि. सोलापूर)  ः उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील गावांना उचलून न्यायचा चाललेल्या प्रयत्नांबद्दल सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. इंदापूरबाबतचा निर्णय हा पूर्णपणे अनैसर्गिक आहे. उजनीच्या पाणीवाटपाबाबत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होत असताना आमदार बबनदादा शिंदे यांनी आंदोलन उभे करावे आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभे राहू, असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनचे उपाध्यक्ष भारत आबा शिंदे यांनी व्यक्त केले. 

भामा आसखेड धरणातील पाणी उजनी धरणात आणून सोलापूर जिल्ह्यातील अपूर्ण योजनेमधील पाटाने भिजणारी गावे भिजवायची सोडून नव्यानेच ते पुन्हा उचलून इंदापूर तालुक्यातील गावांना पाणी देणे, हे पूर्णपणे अनैसर्गिक आहे. सोलापूर जिल्ह्यात धरण असूनही जिल्ह्यातील अनेक योजना निधीअभावी रखडल्या आहेत. अनेक तालुक्यांमधील अनेक गावे अद्याप पाण्यापासून वंचित आहेत. त्या गावांना पाणी देणे, उर्वरित योजनांना निधी देऊन त्या पूर्ण करणे, नवीन योजना आखणे, त्याचा सर्वे करणे आणि उजनीतील पाणी त्या गावांपर्यंत पोचवणे, असे सरकारचे धोरण असायला हवे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

उजनी धरणातील गाळ काढून किंवा वाळू विकून पैसा उभा राहील. त्यामधून उजनी धरणाची पाण्याची क्षमताही वाढेल आणि ज्या योजना आहेत, त्याही पूर्ण करायला निधी मिळेल. कृष्णा-भीमा स्थिरीकरणसारखी योजना मंजूर करुन, त्या योजनेला निधी दिला तर त्याद्वारे पाणी जास्त येऊन सोलापूर जिल्ह्यातील जी गावे अद्याप पाण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासह मराठवाड्यातीलही शेतकऱ्यांना पाणी मिळेल.

त्यामुळे सरकारने या गोष्टीचा फेरविचार करावा. जादा पाणी साठवणे, जादा पाणी आणणे, राहिलेल्या अपूर्ण योजना पूर्ण करणे आणि त्यानंतर नवीन योजनांचा विचार करणे अशा पद्धतीने जर काम केलं तर ते लोकहिताचे ठरणार आहे. कारण माढा तालुक्यावर अन्याय होतो, असे दिसते. माढा तालुका काही महाराष्ट्राच्या बाहेर नाही. त्यामुळे सरकारने ‘सवतीच प्रेम' याठिकाणी दाखवू नये, तर सर्वांना समान न्याय द्यावा अशी भूमिका शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
 
माढा तालुक्याचाच विचार करायचा झाला तर सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून अंबाड, शिराळ, पिंपळकुटे, भोसरे, कुर्डू, बावी, अंजनगाव, तुळशी, परितेवाडी, परिते, घोटी, आहेरगाव व अकोले बुद्रुक ही गावे पाटाने भिजायचे अद्यापही बाकी आहेत. मग ही गावे भिजवायची सोडून नवीनच योजना काढून पुन्हा ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे,  हे अनैसर्गिक, माढा तालुक्यावर अन्याय करणारे आहे, असेही भारतआबा शिंदे यांनी सांगितले. 

सीना माढा उपसा सिंचन योजनेतील 42 गावांसाठी पावणे पाच टीएमसी पाणी लागणार आहे. मात्र, आता इंदापूर भागातील गावांसाठी नव्याने पाच टीएमसी म्हणजे सीना माढा उपसा सिंचन योजनेपेक्षा अधिक पाणी घेऊन चालले आहे,  ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. माढा तालुका व सोलापूर जिल्ह्यावर उजनी पाण्याच्या वाटपाबाबत अन्याय होत असताना आमदार बबनदादा शिंदे यांनी खंबीरपणे आंदोलन करावे, आम्ही त्यांच्यापाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहू, असे मत भारत शिंदे यांनी व्यक्त केले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com