...अन्‌ ऍड. अशोक पवार विधानसभा अध्यक्ष बनले! 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ऍड. पवार यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती.
MLA Ashok Pawar worked as the Speaker of the Legislative Assembly
MLA Ashok Pawar worked as the Speaker of the Legislative Assembly

शिरूर : शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (ता. 2 मार्च) विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापूर्वीही तालिका अध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून अशोक पवार यांच्या माध्यमातून शिरूरला बहुधा प्रथमच संधी मिळालेली असावी. 

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. राज्यपालांचे अभिभाषण आणि शोकप्रस्ताव मांडल्यानंतर सोमवारी (ता. 1 मार्च) विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आज (ता. 2 मार्च) कामकाजावेळी आमदार ऍड. अशोक पवार यांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर आज दुपारनंतरच्या सत्रात त्यांनी कामकाज पाहिले. या वेळी अनेक आमदारांनी पवारांच्या परवानगीने राज्यपालांच्या अभिभाषणावर विचार व्यक्त केले. त्यांचा "अध्यक्ष महोदय' असा उल्लेख करीत आमदारांनी आपले विचार मांडले. 

मागील विधानसभा निवडणुकीत सुमारे 42 हजारांच्या मताधिक्‍क्‍याने विजय मिळविल्यानंतर व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ऍड. पवार यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळातील जागावाटपात त्यांना संधी मिळू शकली नाही.

पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्षपद देऊन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला. त्यानंतर झालेल्या अधिवेशनात एक दिवसासाठी विधानसभेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधीही त्यांना मिळाली. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. 

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज चालवितानाचे आमदार पवार यांचे फोटो व व्हिडिओ आज सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अभ्यासू आमदार म्हणून पवार यांची ख्याती आहे. त्या बळावर त्यांना भविष्यात राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे त्यांचे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत होते. 

विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिल्यानंतर आमदार ऍड. अशोक पवार यांनी "सरकारनामा' शी संवाद साधताना ही संधी मिळाल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर सोमवारी अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेतल्यानंतर आज पक्षाने थेट तालिका अध्यक्ष म्हणून निवड केली आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळाली. ही मोठी व जबाबदारीची संधी असून, पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे ही संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीच्या सर्व नेतेमंडळींचे आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com