अजितदादांची ती घोषणा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे खरी करून दाखविणार?  - Minister of State Dattatreya Bharane Will make Ajit Pawar's announcement come true? | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांची ती घोषणा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे खरी करून दाखविणार? 

विनायक चांदगुडे 
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

बहुतांश ग्रामपंचायतींवर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने दावा केला आहे.

शेटफळगढे  (जि. पुणे) : नुकत्याच निवडणुका झालेल्या इंदापूर तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने दावा केला आहे. इंदापुरात शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) झालेल्या कार्यक्रमात त्याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वाधिक ग्रामपंचायती आल्याचे सिद्ध करण्यासाठी गावानुसार एका ओळीत सरपंच उभे करण्याचे घोषणा केली आहे. अजितदादांची ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी मंत्री भरणे कोणते डावपेच खेळतात, याकडे तालुक्‍यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

येत्या 9 व 10 फेब्रुवारी रोजी इंदापूर तालुक्‍यात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत मंत्री भरणे आणि माजी मंत्री पाटील या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांपैकी कोणाच्या समर्थकांची सरशी होणार? याकडे तालुक्‍याचे लक्ष असणार आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीत होत्या, त्यापैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. उर्वरीत 57 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले, तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले.

त्यानंतर लागलीच भरणे व पाटील या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांनी तालुक्‍यातील सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याच पक्षाच्या ताब्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, तालुक्‍यातील निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या 60 असताना भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या ही 60 पेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे इंदापुरातील जनतेला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची सरशी झाली, याचे उत्तर मिळाले नव्हते. 

दरम्यान, इंदापूर येथे झालेल्या सहा फेब्रुवारीच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आल्याचा दावा केला होता. ते एवढ्यावरच थांबले नाही तर सरपंच निवडीनंतर सर्वाधिक सरपंच आल्याचे सिद्ध करण्यासाठी गावानुसार सरपंच एका ओळीत उभे करण्याची घोषणाही अजितदादांनी केली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील 9 व 10 फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीत या दोन्हीही आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

अजितदादांची ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आता राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे कोणते डावपेच खेळातात, हे पहावे लागेल. कारण, ग्रामपंचातय निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार त्यांनी भरणेवाडीत तातडीने केला होता. त्यावेळी काय ठरले, हेही गुलदस्त्यात आहे. 

इंदापूर तालुक्‍यात कोणाची सरशी होणार, याचे उत्तर मात्र सरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्यानंतरच खऱ्या अर्थाने मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख