पुणे : "पवारसाहेब, आमचा राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) असला तरी तुमचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला "एसटी'च्या सुविधा मिळण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्यावा, अशी माझी विनंती आहे,'' अशा शब्दांत रासपचे अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवारांना साकडे घातले.
जेजुरी मार्तंड देवस्थान संस्थानच्या वतीने जेजुरीतील मार्तंड गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात बोलताना जानकर यांनी वरील मागणी शरद पवार यांच्याकडे केली.
जानकर म्हणाले की, ऐतिहासिक जेजुरी नगरीतील खंडोबा गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मी मार्तंड ट्रस्टचे अभिनंदन करतो.
"अहिल्यादेवी व उमाजी नाईक उपेक्षित समाजाचे आहेत. धनगर आणि रामोशी समाजाची अवस्था अत्यंत खराब आहे. या समाजाला सर्वांनी मिळून न्याय द्यावा. या देशाची सत्ता खऱ्या अर्थाने बहुजनांच्या हातात नाही; म्हणूनच आम्हाला पक्ष काढावा लागला. पवार साहेब तुमचा पक्ष मोठा आहे, माझा पक्ष छोटा आहे. पण, हेच पक्ष खऱ्या अर्थाने बहुजनांच्या हिताचे आहेत. याचा विचार आपण सर्व मंडळींनी केला पाहिजे,'' असे आवाहन महादेव जानकर यांनी केले.
शरद पवार यांचा पक्ष मोठा आहे. जेजुरीच्या नगराध्यक्षांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांच्या पक्षानी काही हिस्सा उचलावा. माझा पक्ष छोटा पण मीही काही वाटा उचलतो, असेही जानकर यांनी नमूद केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुरंदर तालुकाध्यक्षाने मार्तंड ट्रस्टला प्रथम निवेदन दिले होते. त्यानंतर या पुतळ्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले, असेही ते म्हणाले.
माझ्या पक्षाची स्थापना रोहितदादांच्या मतदारसंघात
राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात म्हणजेच चौंडी या गावात झाली आहे. माझ्या पक्षाच्या स्थापनेवेळी प्रवीण गायकवाडसुद्धा उपस्थित होते, असे महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

