सत्ताधारी पॅनेलच्या दडपशाहीला झुगारुन, मतदार परीवर्तन करणार- माधव काळभोर यांचा विश्वास.. - Madhav Kalbhor believes that voters will change by overcoming the oppression of the ruling panel. | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ताधारी पॅनेलच्या दडपशाहीला झुगारुन, मतदार परीवर्तन करणार- माधव काळभोर यांचा विश्वास..

जनार्दन दांडगे 
बुधवार, 13 जानेवारी 2021

लोणी काळभोरचे सुज्ञ मतदार जनतेच्या प्रश्नांची जाणीव असलेल्या परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देऊन, सत्तेचे परीवर्तन करणार

उरुळी कांचन :  लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत पुढील काळात मोठ्या प्रमानात नागरीकरण होणार आहे. यामुळे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन, ग्रामपंचायत हद्दीत पायाभुत सोयीसुविधा वाढविण्याची गरज आहे. त्यातच मागिल पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी लोकांच्या दडपशाहीमुळे मतदार नाराज आहेत.

यामुळे लोणी काळभोरचे सुज्ञ मतदार जनतेच्या प्रश्नांची जाणीव असलेल्या परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देऊन, सत्तेचे परीवर्तन करणार असा आत्मविश्वास यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जेष्ठ नेते माधव काळभोर यांनी व्यक्त केला आहे.  या प्रचारानिमित्त रायवाडी परीसरात घोंगडी बैठकीत उपस्थित मतदारांना संबोधित करताना माधव काळभोर यांनी हा विश्वास व्य़क्त केला.                             

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर यांच्या सह पॅनेलचे सर्व उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना माधव काळभोर म्हणाले, लोणी काळभोर व परीसराची पुढील पंचवीस वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, रस्ते, शाळा, क्रीडांगण आदी पायाभूत सोयीसुविधा कशा प्रकारे राबवायच्या या संदर्भातील विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

या विकास आराखड्या नुसार विकास कामे केल्यास लोणी काळभोर ग्रामपंचायत पुणे जिल्ह्यातील एक नंबरची ग्रामपंचायत होईल अशा प्रकारे विकास कामांचे नियोजन परिवर्तन पॅनेलच्या वतीने करण्यात आले आहे. 

यावेळी बोलतांना शिवदास काळभोर म्हणाले, परीवर्तन पॅनेल सत्तेवर आल्यास, प्रत्येक घरावर शासकीय अनुदानावर सौर उर्जा पॅनेल बसवण्यासाठी नागरीकांना मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या वीजबीलाचा खर्च कमी होईल. कचरा व्यवस्थापन करुन त्यात तयार झालेले खत शेतक-यांना मोफत देण्यात येणार आहे.

अद्ययावत क्रीडांगण, पोहण्यासाठी तलाव, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व व्यायामशाळा उभारणे. अपूर्ण असलेला मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणे. मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे. गावामध्ये मोफत वायफाय सुविधा पुरवणे. मंगल कार्यालय बांधून गरीब नागरिकांना अत्यल्प दरात भाड्याने देणे आदी विकासकामे आगामी काळात करण्यात येणार आहेत. 

यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर म्हणाले, वर्षांच्या काळात महिलांना शिलाई मशीन, पीठ गिरणी तर शेतक-यांना विहीरीवरील इलेक्ट्रिक मोटर, कुट्टी मशीन, पाईप, गरजूंना घरकुल, शौचालय अनुदान, नाभिक समाजाला खुर्च्या, वाड्या वस्त्यांमध्ये पथदिवे आदी गोष्टी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध रस्ते सिमेंट व डांबर वापरुन उत्कृष्ट बनविण्यात आले आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष निधी उपलब्ध केल्या मुळे या केंद्राला राज्य पातळीवरील पारितोषिक मिळाले आहे. आदी कामे गेल्या काही वर्षांत करण्यात आली आहेत.

या सर्व बाबी मतदारांच्या समोर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणार आहेत यात शंकाच नाही. असा, ठाम आत्मविश्वास माधव काळभोर यांनी व्यक्त केला.  

लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील ग्रामपंचायतींची निवडणूक शुक्रवारी (ता. १५) होणार आहे. लोणी काळभोरची सत्ता मिळवण्यासाठी मोबाईल एसएमएस, ध्वनीमुद्रित कॉल रेकॉर्डिंग, प्रचार फेरी, पदयात्रा, बॅनर, फ्लेक्स, पॅम्पलेट, जाहीरनामा, एअर बलून, घोंगडी बैठका, कोपरा सभा, मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेणे, नाते संबंध, भावकी, मळा आदी घटकांचा वापर परिवर्तन पॅनेल करत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख