अविश्वास ठरावाच्या राजकारणास नाट्यमय कलाटणी : पोखरकरांची मोहितेंवर तात्पुरती मात - Khed Sabhapati Bhagwan Pokharkar's no-confidence motion adjourned by High Court | Politics Marathi News - Sarkarnama

अविश्वास ठरावाच्या राजकारणास नाट्यमय कलाटणी : पोखरकरांची मोहितेंवर तात्पुरती मात

राजेंद्र सांडभोर 
गुरुवार, 10 जून 2021

त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस  व शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपांची धुळवड रंगली.

राजगुरुनगर (जि. पुणे) : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात पेटलेल्या वादाला कारणीभूत असलेला खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला आज (ता. १० जून) स्थगिती मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने या ठरावाला स्थगिती दिली आहे.  दरम्यान, या ठरावाला स्थगिती मिळवून सभापती पोखरकर यांनी आमदार मोहिते यांच्यावर तात्पुरती तरी मात केली आहे.  (Khed Sabhapati Bhagwan Pokharkar's no-confidence motion adjourned by High Court)

शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे  ३१ मे रोजी पीठासीन अधिकारी असलेले खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज (ता. १० जून) सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती दिली व पुढील सुनावणी २६ जून रोजी होणार असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. रोहन होगले यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनीच ही माहिती दिली. 

हेही वाचा : महेश कोठेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; पण या नेत्याच्या ग्रीन सिग्नलनंतरच

अविश्वास ठरावानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य, नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सहलीला गेलेले आहेत. या स्थगितीच्या निर्णयामुळे आता त्यांचा मुक्काम वाढणार की ते सहलीवरुन परत येणार, याबाबतही लोकांना उत्सुकता आहे. 

सभापती पोखरकर यांच्यावर २४ मे रोजी, शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंड करीत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ आणि भाजपच्या एकमेव सदस्य, विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर ठरावाचे समर्थक सदस्य सहलीला गेले होते. दरम्यान ते पुण्याजवळ ज्या रिसॉर्टवर थांबले होते, त्याची माहिती पोखरकर व समर्थकांना मिळाली. त्यानुसार ते समर्थकांसह त्याठिकाणी गेले व राडा केला. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या राजकारणाला हिंसक वळण लागले व  त्यांना अटकही झाली. त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस  व शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपांची धुळवड रंगली. राष्ट्रवादीच्या बाजूने आमदार दिलीप मोहिते व शिवसेनेच्या बाजूने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाग्युद्ध पेटले होते. 

त्यानंतर ३१ मे रोजी शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंडखोरी केल्याने पोखरकरांवरील अविश्वास ठराव सहज मंजूर झाला. शिवसेनेचे बहुमत असतानादेखील, शिवसेनेच्याच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आणि यामागे आमदार मोहिते यांचा हात असल्याच्या संशयावरून शिवसेना चिडली. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राजगुरूनगर येथे येऊन आमदार मोहितेंवर थेट शरसंधान केले. आमदारांनीही त्यांना उपहासात्मक पद्धतीने प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हा वाद पेटलेला असतानाच आता अविश्वास ठरावाच्या मंजुरीला स्थगिती मिळाल्याने या विषयाला वेगळेच वळण मिळाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख