जयंत पाटलांनी शब्द पाळला : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरू - Jayant Patil kept his word: Survey of Mangalvedha Upsa Irrigation Scheme started | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांनी शब्द पाळला : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरू

हुकूम मुलाणी
शनिवार, 8 मे 2021

भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूरला आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भालके यांच्या पाण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले होते.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या (Mangalvedha Upsa Irrigation Scheme) माध्यमातून तालुक्यातील वंचित 24 गावांना पाणी देण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यासंदर्भात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सलगर बुद्रूक येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शब्द दिला होता. तो त्यांनी खरा केला आहे. (Jayant Patil kept his word: Survey of Mangalvedha Upsa Irrigation Scheme started)

राजकीय पातळीवर 2009 पासून खळबळ उडवून देणाऱ्या 35 गाव उपसा सिंचन योजनेवरून अजूनही चर्चा सुरू आहे. जवळपास 560 कोटी रुपयांच्या या योजनेस 2014 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे या योजनेतील गावे आणि 1 टीएमसी पाणी कमी करून या योजनेसाठीचा प्रस्ताव मागील भाजप-शिवसेना सरकारच्या काळात सादर करण्यात आला होता. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी निघाल्यामुळे हा प्रस्ताव परत आला होता.

हेही वाचा :  सीएसआरमधून कोविड हॉस्पिटल उभारा; अन्यथा वेगळा विचार करावा लागेल

दरम्यान, पुन्हा राज्यात सत्ताबदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात या योजनेतील सर्व गावे व 2 टीएमसी पाणी हे पूर्ववत ठेवण्याच्या अटीवर (स्व.) आमदार भारत भालके यांनी मान्यता मिळविली होती. त्यानंतर या योजनेतील त्रुटीची पूर्तता करण्यात येत असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस भालके यांचे निधन झाले. पण, रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांना मोबाईलवर संदेश पाठवून पुत्र भगिरथ भालके यांना सोबत घेऊन जलसंपदा मंत्र्यांकडे या योजनेसाठी लेखाशिर्ष खाते उघडण्याबाबत पाठपुरावा करण्यास सांगितले होते. 

भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूरला आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भालके यांच्या पाण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले होते. त्यांची अपूर्ण कामे मार्गी लावणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे सूतोवाच अनेक नेत्यांनी केले होते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सुधारित प्रस्ताव सरकारला सादर होणार आहे.

या योजनेच्या सर्वेक्षणासाठी सरकारने 2 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद केली आहे. बंदिस्त पाइपलाइनद्वारे 21 हजार 358 हेक्‍टरचे सर्वेक्षण करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाने निविदा काढली. या सर्वेक्षणांमधून कालव्याद्वारे बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देता येणे शक्य आहे का, याबाबत सर्वेक्षण सुरू झाले.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावामध्ये कालव्याद्वारे पाणी देण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला. सध्या दोन टीएमसी पाण्याची तरतूद झाल्यामुळे लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. या सर्वेक्षणातून जर बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यास ज्यादा क्षेत्र ओलिताखाली येणार असल्यामुळे आचारसंहिता संपताच सुरू झालेले सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण होणार आहे.
-नारायण जोशी, कार्यकारी अभियंता, उजनी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख