पुणे : "आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातच होणार आहे. मात्र, विमानतळाची नवीन जागा ही यापूर्वीच्या जागेजवळ असून, पूर्वीपेक्षा उपयुक्त आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस प्रस्ताव पाठविण्यात येईल,'' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 12 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत दिली.
पुरंदर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी विमानतळाच्या जागेला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमके कोठे होणार, याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. तसेच, खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनीही आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा खेड तालुक्यात देण्यात यावे, अशी मागणी केली होती. तसेच, नव्या जागेबाबत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे विमानतळाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली होती. त्यावर अजित पवारांच्या आजच्या वक्तव्याने पडदा पडल्याचे बोलले जात आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "पुरंदर तालुक्यात यापूर्वी विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेच्या तुलनेत नवीन जागा ही उपयुक्त आहे. त्या ठिकाणी खाचखळगे कमी आहेत. बागायती क्षेत्र कमी आहे आणि विमानाच्या लॅंडिंग आणि टेकऑफसाठी ही उपयुक्त आहे. त्यामुळे नवीन विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होईल.''
शिवजयंती साधेपणाने साजरी करणार
राज्यात येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार आवश्यक खबरदारी घेत आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून, नियमाचे पालन करील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. परंतु संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करणार असल्याचे म्हटले आहे.
या संदर्भात पवार म्हणाले, गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महापुरुषांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळासुद्धा साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा शिवजयंतीच्या कार्यक्रमाला केवळ 100 जणांची उपस्थिती ठेवता येणार आहे.
हेही वाचा : पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणणार
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता खेचून आणेल, असे सांगून महापालिकेत पक्षाची सत्ता असेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात व्यक्त केला.
भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेतील विविध विकास कामांचा आढावा गुरुवारी (ता. 11 फेब्रुवारी) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर फडणवीस यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना चांगले काम केल्याची पोचपावती दिली. तसेच, आगामी निवडणुकीतही भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्याबाबत पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.
पुणे महापालिकेतील योजनांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील लोक "पुन्हा आमची सत्ता येणार' असे म्हणतात, तर विरोधी पक्षातील लोक "आम्ही सत्ता खेचून आणणार' असे म्हणतात. त्यानुसार महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्ही या वेळी सत्ता खेचून घेणार आहोत.

