सोलापूर : शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. 12 फेब्रुवारी) सकाळपासून सोलापूरच्या दौऱ्यावर होते. आजच्याच दिवशी सोलापूरचे पालकमंत्रीही दत्तात्रेय भरणेदेखील सायंकाळनंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले. शिवसेनेचे मंत्री सामंत यांच्या दौऱ्याला जय महाराष्ट्र करत माजी महापौर महेश कोठे यांनी पालकमंत्री भरणे यांच्या गाडीतून प्रवास करत सोलापूर शहरातील कार्यक्रमाला हजेरी लावली.
शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न मध्यंतरी माजी महापौर कोठे यांनी केला. हा प्रयत्न यशस्वी झाला की अपयशी ठरला? या प्रश्नाचे ठोस उत्तर अद्यापही शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मिळालेले नाही. आज एकाच दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर मात्र महेश कोठे कोणाचे? या प्रश्नाचे अप्रत्यक्ष उत्तर सर्वांना मिळाले आहे.
सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आल्यानंतर त्यांच्या वाहनात बसून महेश कोठे यांनी प्रवास केला. महेश कोठे यांची पालकमंत्री भरणे यांच्यासोबतची आजची सलगी पाहून कोठे राष्ट्रवादीच्या तंबूत अधिकृतरित्या लवकरच दाखल होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज सायंकाळी सोलापूरचा दौरा केला. वळसंग, किडवाई चौक, सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, दहिटणे येथील बुद्धविहार येथे जाऊन त्यांनी पाहणी केली.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी बैठक घेतली. सोलापूर शहर व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, महापालिकेतील गटनेते किसन जाधव, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी सोलापूर शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. या वेळी एमआयएमचे नगरसेवक देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.

