बबनदादाही उजनीसाठी रिंगणात : आदेश रद्द न झाल्यास आमदारकीचा राजीनामा - If the Ujani's water order is not canceled, will resign as MLA : Babandada Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

बबनदादाही उजनीसाठी रिंगणात : आदेश रद्द न झाल्यास आमदारकीचा राजीनामा

प्रमोद बोडके 
गुरुवार, 20 मे 2021

माझ्या पक्षाच्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे.

सोलापूर : सध्याची वेळ ही राजकारणाची नाही, तर सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अस्मितेसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित येण्याची आहे. उजनीच्या (Ujani) पाण्याचे पूर्ण वाटप झालेले  आहे, त्यामुळे उजनीतून इंदापूरला (Indapur) पाणी देण्याचा प्रश्‍नच येत नाही. हा आदेश रद्द करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा आदेश रद्द होईल. आदेश रद्द झाला नाही, तर आपण सोलापूर जिल्ह्याच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊ, अशी भूमिका माढ्याचे (जि. सोलापूर) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी घेतली आहे. (If the Ujani's water order is not canceled, will resign as MLA : Babandada Shinde)

सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघातून आमदार बबनदादा शिंदे हे सलग सहा वेळा विक्रमी मताधिक्‍यांनी विजयी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वात ज्येष्ठ म्हणूनही त्यांची ओळख आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी उजनीच्या पाण्यासाठी आमदारकीच्या राजीनाम्याची भूमिका घेतली आहे. 

हेही वाचा : सत्तांतर होताच ‘गोकुळ’च्या २०० रोजंदारी कर्मचाऱ्यांना नारळ  

सोलापूर जिल्ह्यात माढ्यातून आमदार बबनदादा शिंदे व मोहोळमधून यशवंत माने हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेले विधानसभा सदस्य आहेत. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय  शिंदे यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला पाठींबा दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावरील दोन व अपक्ष एक असे तीन आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी राजीनाम्याची भूमिका घेतली आहे, तर आमदार यशवंत माने यांची जन्मभूमी इंदापूर असतानाही त्यांनी सोलापूर जिल्ह्याची बाजू घेतली आहे.

आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, इंदापूरच्या पाच टीएमसी पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चर्चा मोठया प्रमाणावर रंगताना दिसत आहेत. माझ्या पक्षाच्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला हा आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या श्रेयवादावरून बरीच चर्चा होत आहे. राजकीय आरोप एकमेकांवर करत आहेत; परंतु ही वेळ राजकारण करण्याची नाही, या वेळी जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे.

 
उजनी धरणात कोणत्याही प्रकारचे पाणी शिल्लक नाही. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्याच्या दोन ते तीन पाळ्यादेखील व्यवस्थित मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इंदापूरच्या योजनेला पुणे पिंपरी-चिंचवड शहराचे सांडपाणी द्यायचे असेल, तर ते पुण्याजवळूनच उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात टाकून द्यावे. त्यास आमचा विरोध असण्याचे काहीएक कारण नाही. मात्र, जर कोणी उजनीतून पाणी नेणार असेल तर आम्ही जनतेच्या सोबत राहू. सरकारने जर उजनीतून पाणी उचलण्याच्या आदेश रद्द केला नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वप्रथम मी राजीनामा देईन, असे स्पष्ट भूमिका आमदार बबनदादा शिंदे यांनी घेतली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख