हर्षवर्धन पाटलांसारखे खोटे बोलून मला जनतेची फसवणूक करायची नाही : भरणे  - I don't want to deceive the people by lying like Harshvardhan Patil : Dattatreya bharane | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

हर्षवर्धन पाटलांसारखे खोटे बोलून मला जनतेची फसवणूक करायची नाही : भरणे 

राजकुमार थोरात 
शनिवार, 20 मार्च 2021

मी लबाडी करणारा माणूस नाही.

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील विरोधकांना पाण्याचे राजकारण करावयाचे आहे. मला मात्र शेतीच्या पाण्यासाठी लढायचं आहे. तालुक्‍यातील त्या 22 गावांसह इतरही गावच्या शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लावायचा आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेतला टीका केली. 

इंदापूर तालुक्‍यातील निमसाखर येथील रस्त्याच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात राज्यमंत्री भरणे बोलत होते. या वेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, सरपंच धैर्यशिल रणवरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, नंदकुमार रणवरे, वीरसिंह रणसिंग, विनोद रणसिंग, डॉ.एन.जी.रणवरे, पोपट कारंडे, सुरेश लवटे उपस्थित होते. 

हेही वाचा  : मोहिते पाटलांच्या मर्जीने राष्ट्रवादीत पदाधिकारी निवडी; उत्तम जानकरांनी खदखदीला तोंड फोडले 

राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले की, तालुक्‍यातील विरोधकांना (हर्षवर्धन पाटील) पाण्याचे राजकारण करावयाचे आहे. लाकडी-निंबोडी पाणी योजनेची सविस्तर माहिती ते मला विचारत आहेत. खोटी आश्‍वासने देण्याचा माझा स्वभाव नाही. मी लबाडी करणारा माणूस नाही. खोटे बोलले नागरिकांना लवकर पटते. मात्र, मला विरोधकांसारखे खोटे बोलून जनतेची फसवणूक, दिशाभूल करायची नाही. 

इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी सणसर कटची निर्मिती केली आहे. खडकवासला प्रकल्पाचे पाणी सणसर कटमधून आणून 22 गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला जाईल. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे नीरा डाव्या कालव्याचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न हाणून पाडून येणाऱ्या काळात इंदापूरच्या हक्काच्या पाण्याला धक्का न लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असा दावाही भरणे यांनी या वेळी बोलताना केला. 

लाकडी-निंबोडी सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. आगामी काळामध्ये फक्त शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी लढा देणार आहे आहे. हर घर जल योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्‍यासाठी 249.17 कोटी रुपयांचा निधी आणला असून तालुका टॅंकरमुक्त करून महिलांच्या डोक्‍यावरील हंडा कायमस्वरुपी उतरविणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख