अजितदादा आता ती भीष्मप्रतिज्ञा कशी पूर्ण करणार?

आज ५० वर्षांच्या काळानंतर हे सगळं मृगजळच ठरले आहे.
How will Ajit Pawar solve Indapur's water problem now?
How will Ajit Pawar solve Indapur's water problem now?

इंदापूर  (जि. पुणे) : उजनी जलाशयात पुणे, पिंपरी चिंचवड येथून भीमा नदीतून येणारे ५ टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यास देण्याचा आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ हुल्ले यांनी आज रद्द केला. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे तसेच ५३ गावांतील शेतकऱ्यांचे बारमाही पाण्याचे स्वप्न भंगले आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वाढते राजकीय वजन पाहून त्यांना तोंडघशी पाडल्याची चर्चा रंगली आहे. ये तो ट्रेलर है, चित्रपट अभी बाकी है, असे म्हणणाऱ्या मंत्री भरणे यांनी तालुक्यात नायक म्हणून सहानुभूती मिळवली. मात्र, यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षश्रेष्ठी खलनायक ठरले आहेत. (How will Ajit Pawar solve Indapur's water problem now?)

इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा पाण्याचा संघर्ष (कै.) सूर्यकांत रणवरे यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये सुरु झाला. त्यांच्या व समितीच्या संघर्षाची दखल घेवून तालुक्यातील २२ गावांसाठी नीरा डावा कालव्यातून ४ व खडकवासला धरणातून ३.९ टीएमसी असे एकूण ७.९ टीएमसी पाणी सणसर कटची स्थापना करुन देण्याचे ठरले. त्याचे काम मार्च १९९४ मध्ये पूर्णत्वास गेले. मात्र, हे पाणी नक्की कुठे मुरले, हा संशोधनाचा विषय आहे. 

इंदापूर तालुक्यातील शेळगाव, अंथुर्णे, रेडा, रेडणी, शिरसटवाडी, निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, गोतंडी, बोराटवाडी, चाकाटी, पिटकेश्वर, निमगाव केतकी, पिठेवाडी, लाखेवाडी, वडापुरी, काटी, भांडगाव, अवसरी या गावांच्या बारमाही पाण्याचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. या गावांना बारमाही पाणी मिळण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून रणवरे यांनी १९७१ पासून आंदोलने, रास्ता रोको, उपोषण करून या प्रश्नांची दखल सरकारला घ्यायला लावली. त्यामुळे २० फेब्रुवारी १९८९ रोजी तालुक्यातील बावीस गावांना आठमाहीऐवजी बारमाही पाणी देण्याचा निर्णय झाला. त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात शासकीय अध्यादेशदेखील निघून ६४७. ७९ लाख एवढा निधीही मंजूर करण्यात आला. कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर सणसर कटचे काम १९९४ ला पूर्ण झाले.

ता. ९ ऑगष्ट १९९४ रोजी क्रांतीदिनाच्या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, खासदार बापूसाहेब थिटे यांच्या प्रमुख उपस्थितीत निमगाव केतकी येथे बारमाही पाणी वाटपाच्या निमित्त मोठी सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी बावीस गावांतील शेतकऱ्यांचे बारमाही पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून त्यांनी आपल्या शेतात उसाची लागवड करावी, असे आवाहन केले. मात्र, आज ५० वर्षांच्या काळानंतर हे सगळं मृगजळच ठरले आहे. 

हा प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ३० आमदारांची समिती आणली. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचादेखील समावेश होता. यावेळी पाटील यांना नमुना नंबर ७ वर आठमाही पाणी देण्यास यश मिळाले मात्र, त्यांना बारमाही पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. त्यानंतर दुष्काळी लाकडी-निंबोडी योजनेचेदेखील असेच सूप वाजले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय निवडणुकीत मते मागायला येणार नाही, अशी इंदापूर येथे भीष्मप्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे या योजनांचे काय होणार, अशी चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com