हर्षवर्धन पाटलांच्या निष्ठावंत सहकाऱ्याने दिला सर्व राजकीय पदांचा राजीनामा

त्यामुळे त्यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता.
Harshvardhan Patil's loyal colleague resigned from all political posts
Harshvardhan Patil's loyal colleague resigned from all political posts

इंदापूर (जि. पुणे)  ः इंदापूर तालुक्याच्या राजकारणातील अजातशत्रू नेते, तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते भरत शहा यांनी अचानक आपल्या सर्व पदांचा कौटुंबीक कारणांमुळे राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भरत शहा यांना इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे त्यांनी सोनं करून आपले राजकीय स्थान बळकट केले होते. त्यामुळे त्यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, माजी सहकार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी शहा यांच्या राजीनाम्या संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांचे निष्ठावान सहकारी तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांचे भरत शहा हे पुतणे, तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांचे ते भाऊ आहेत. त्यांनी २००६ पासून सलग पंधरा वर्षे इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.

बँकेची आर्थिक प्रगती, ग्राहकांना विविध सुविधा, पारदर्शी कारभारात शहा यांचा मोठा वाटा आहे. भरत शहा हे पाच वर्षांपासून कर्मयोगी कारखाना संचालक मंडळावर कार्यरत आहेत. इंदापूर नगरपरिषदेचे २०१२ ते २०१७ या कालावधीत ते उपनगराध्यक्ष होते. सन २०१७ पासून ते नगरसेवक म्हणून काम पहात असून नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे ते दीर आहेत. स्वछता अभियानात इंदापूर नगरपरिषदेस देश पातळीवर नेण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये शहा कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. नगराध्यक्षपदी अंकिता शहा या निवडून आल्यामुळे नगरपरिषदेवर हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा झेंडा फडकवण्यात भरत शहा यांचे मोठे योगदान आहे. पाटील यांच्या पडत्या राजकीय काळात शहा कुटुंबाने त्यांना प्रामाणिकपणे साथ दिली आहे.

मी कौटुंबिक अडचणीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला असून सर्व पदाचा राजीनामा दिला असला तरी मी आजही माझे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत आहे. राजकारणात इतरांना संधी देण्यासाठी प्रत्येकाला कुठेतरी थांबावे लागते म्हणून मी थांबण्याचा स्वतःहून निर्णय घेतला आहे. मात्र, नेत्याच्या खांद्याला खांदा लावून कायम काम करणार असल्याची माहिती भरत शहा यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com