दौंडकरांच्या जिवाला घोर; तीन दिवसांत १५ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार - Funeral of 15 people who died due to corona in three days in Daund | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

दौंडकरांच्या जिवाला घोर; तीन दिवसांत १५ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 11 एप्रिल 2021

जागेअभावी तीन मृतदेहांचे जमिनीवर सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दौंड (जि. पुणे) : दौंड शहरातील स्मशानभूमीत मागील तीन दिवसांत पंधरा कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या पंधरा जणांपैकी चौदा जण हे दौंड शहराबाहेरचे होते. परंतु मृतदेह शहरातून नेण्यात आल्याने दौंडकरांच्या जीवाला काही काळ घोर लागला होता.

दौंड शहर व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालय, दौंड नगरपालिका व लिंगाळी (ता. दौंड) हद्दीतील रूग्णालयांमध्ये दौंड तालुक्यासह शेजारील शिरूर आणि श्रीगोंदा (जि. नगर) येथील ग्रामस्थ उपचारासाठी दाखल होत आहेत. मागील आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पंधरा बाधितांचा मृत्यू झाला आहे. हे मृतदेह शहरातील प्रमुख चौकांमधून महात्मा गांधी चौकमार्गे भीमा नदीकाठावरील स्मशानभूमीत रूग्णवाहिकेतून नेण्यात आल्याने दौंडकरांच्या जीवाला घोर लागला होता.

स्मशानभूमीत बिडाच्या पाच शवदाहिन्या आहेत. नगरपालिकेने अंत्यसंस्कारासाठी दत्तात्रेय तुपसौंदर्य व मुकेश तुपसौंदर्य यांची नियुक्ती केली असून ते पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किट परिधान करून अंत्यसंस्कार करतात.  
                 
सध्या मध्यरात्री व पहाटे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. पंधरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही नातेवाईक सावडण्याचा विधी करण्यास वेळेत न आल्याने जागेअभावी तीन मृतदेहांचे जमिनीवर सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शिकाळी धरण्याचा आग्रह? 

रूग्णवाहिकेतून कोरोना बाधितांचा मृतदेह बाहेर काढण्यापासून सरणावर ठेवण्याचे काम करावे लागते. नातेवाईक तेव्हा हातसुध्दा लावत नाहीत. नातेवाईकांनी सांगितले तरच आम्ही अग्निडाग देतो. मात्र अशा परिस्थितीतदेखील काहीजण आम्हाला शिकाळी धरण्याचा आग्रह धरत असल्याने आम्ही त्यास नकार देतो, अशी माहिती मुकेश व दत्तात्रेय तुपसौंदर्य यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख