तावरे गोळीबार प्रकरणात ते नाव पुढे येताच पोलिसही चकित आणि गावकऱ्यांनाही धक्का - Former sarpanch arrested in NCP activist Raviraj Taware Firing case  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

तावरे गोळीबार प्रकरणात ते नाव पुढे येताच पोलिसही चकित आणि गावकऱ्यांनाही धक्का

कल्याण पाचांगणे 
मंगळवार, 6 जुलै 2021

या अगोदर वरील प्रकरणी चार आरोपींना अटक करीत पोलिसांनी संबंधितांवर मोका कायद्यानुसार कारवाई केली होती.

माळेगाव : राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते रविराज तावरे गोळीबार प्रकरणाचा तपास बारामती (Baramati) पोलिसांची कसोटी पाहणारा ठरत असतानाच जखमी तावरे यांच्या जबाबावरून नामांकित व्यक्तीचे नाव संशयित आरोपींच्या यादीत आले आहे. या प्रकरणामध्ये माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे (रा. माळेगाव) यांचा समावेश आहे. त्यामुळे माळेगावच्या गोळीबार प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. (Former sarpanch arrested in NCP activist Raviraj Taware Firing case)  

या अगोदर वरील प्रकरणी चार आरोपींना अटक करीत पोलिसांनी संबंधितांवर मोका कायद्यानुसार कारवाई केली होती. त्यातच आता संशयित आरोपी तावरे यांचे नाव पुढे आल्याने सर्वत्र  खळबळ उडाली. यावरून माळेगावच्या राजकारणात टोकाचा सत्तासंघर्ष आहे, हे स्पष्ट होते. माजी सरपंत जयदीप तावरे यांना मोका कोर्टाने १४ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : राजदंड पळवणाऱ्या आमदार राणांना मार्शल्सनी काढले सभागृहाबाहेर

दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनीही गोळीबार प्रकरणातील पाळेमुळे शोधून काढण्याचा प्रयत्न केल्याचे वरील कारवाईवरून स्पष्ट होते. त्यानुसार तावरे यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईला विशेष महत्व आहे. तावरे यांच्यावर सोमवारी (ता. ३१ मे ) राजकिय वैमनस्यातून गावटी कट्ट्याद्वारे गोळीबार झाला. त्या प्रकरणी तालुका पोलिसांनी तीन सराईत आरोपींसह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगून खून करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमा खाली गुन्हा दाखल केला होता. 

या प्रकरणी तावरे यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली होती. राजकीय व आर्थिक फायदा मिळविणे, तसेच माळेगावात दहशत माजविण्याच्या उद्देशाने प्रशांत पोपटराव मोरे, विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव ( सर्व रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती ) यांच्यासह अल्पवयीन मुलाने पिस्तूलाद्वारे गोळी मारून माझ्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार सौ. तावरे यांनी दिली होती. या फिर्यादीची तात्काळ दखल घेत पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी संबंधित आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांच्यावर मोक्कांतर्गंत कारवाई केली.  

हेही वाचा : निलंबित आमदारांना न्यायालय किंवा राज्यपाल दिलासा देऊ शकतात का?

हे प्रकरण थांबेल असे वाटत असतानाच जखमी रविराज यांच्या जबाबात आणखी महत्वपुर्ण माहिती पुढे आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. जयदीप तावरे गोळीबाराच्या कटात सहभागी असल्याची तक्रार रविराज तावरे यांनी केल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. 

तावरे यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरलेला गावटी कट्टा आरोपी मोरे यानेच नगर जिल्ह्यातून आणला होता. या प्रकरणाचा मास्टर माईडच आरोपी प्रशांत मोरे हाच असून त्यानेच रविराज तावरे यांना संपविण्यासाठी कटकारस्थान रचले होते, हे आजपर्यंतच्या पोलिस तपासात पुढे आले होते. परंतु जखमी रविराज  यांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. त्याच्या जबाबातून गोळीबारच्या कटात जयदीप तावरे यांचे नावे पुढे आल्याने पोलिसही हादरले, तर गावकऱ्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी तावरे यांना अटक केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख