मोहिते म्हणजे पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील ‘ब्लॅक फंगस’ : आढळरावांचा सणसणीत टोला

सभापती भगवान पोखरकर व सहकार्‍यांवर, पोलिसांना हाताशी धरून, खोट्या गंभीर गुन्ह्यांची कलमे लावली.
 Shivarijarav Adhalrao Patil, Dilip Mohite .jpg
Shivarijarav Adhalrao Patil, Dilip Mohite .jpg

राजगुरूनगर : खेडचे आमदार दिलीप मोहिते (MLA Dilip Mohite) हेच गुन्हेगारी, विध्वंसक व विक्षिप्त प्रवृत्तीचे असून ते खेड तालुक्याच्या व पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील 'ब्लॅक फंगस' म्हणजे काळी बुरशी आहेत. शुक्रवारी डोणजे येथील आमदारांच्या रिसॉर्टमध्ये झालेल्या किरकोळ मारामारीला अतिरंजित स्वरूप देण्याचे कुभांड मोहिते यांनी रचले.असा पलटवार माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivarijarav Adhalrao Patil) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. (Former MP Shivarijarav Adhalrao Patil criticizes MLA Dilip Mohite)

सभापती भगवान पोखरकर व सहकार्‍यांवर, पोलिसांना हाताशी धरून, खोट्या गंभीर गुन्ह्यांची कलमे लावली. त्या ठिकाणी गोळीबार झालेला नाही, कोणाकडेही शस्त्र नव्हते. मात्र, फूस लावून पंचायत समिती सदस्य पळवून आपल्या रिसॉर्टवर ठेवल्याचे बिंग फुटले म्हणून आमदारांनी गंभीर गुन्ह्याचा बनाव रचला, खेडचे पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावामुळे शुक्रवारी डोणजे येथील रिसॉर्टवर झालेल्या मारामारीनंतर, आमदार मोहिते यांनी या प्रकरणाचे सूत्रधार आढळराव पाटील असल्याचा आरोप केला होता. त्याला आज आढळरावांनी प्रतिउत्तर दिले.

यावेळी शिवाजी वरपे, रामदास धनवटे, बाबाजी काळे, तनुजा घनवट, अमोल पवार, राहुल गोरे, विजया शिंदे, अशोक खांडेभराड, नितीन गोरे, राजेश जवळेकर, सुरेश चव्हाण, मारुती सातकर, दिलीप तापकीर आदी उपस्थित होते.   
  
यावेळी आढळराव पाटील म्हणाले, माझ्यावर सूत्रधार असल्याचा केलेला आरोप खोटा असून, मी अशा भानगडीत पडत नाही. अशा प्रकारचा थिल्लरपणा कधीही करणार नाही. जनतेलाही हे पटणार नाही. मोहिते यांच्यावर मात्र विनयभंगाचे, माराहाणीचे गुन्हे आहेत. आमदार होण्यापूर्वी त्यांच्यावर 302 चाही गुन्हा होता. त्यांनी माझ्यावर मारामारी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. मोहिते जेव्हा-जेव्हा सत्तेत येतात तेव्हाचे सत्तेचा दुरुपयोग करतात. मोहिते आमदार नसताना गेल्या पाच वर्षात खेड तालुक्यात शांतता होती, असे ते म्हणाले.

मोहितेंना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिले नाही, मी राजीनामा देतो. तहसीलदारांची बदली झाली नाही, मी राजीनामा देतो, असे बालिशपणाचे राजकारण करत असतात. तीन पक्षांची आघाडी असताना, घटक पक्षांच्या सदस्यांना फितवून, आमिषे दाखवून आणि बळजबरीने शिवसेनेच्या सभापतींवर अविश्वास ठराव दाखल करण्यात प्रवृत्त केले. त्यानंतर त्या सदस्यांना स्वतःच्या रिसॉर्टवर ठेवले. त्या ठिकाणी ३० ते ३५ गुंड नेऊन ठेवले.

या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत गेल्या. ते बिंग फुटल्यानंतर, सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून त्यांनी हे कुभांड रचले. सभापती पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणाहून शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांचे फोन आल्यानंतर, त्यांना घेण्यासाठी ते तेथे गेले होते. त्यावेळी तेथील उपस्थित गुंडांनी त्यांना विरोध केल्याने मारामारी झाली. परंतु गोळीबार झाला नाही व त्यांच्याकडे हत्यारेही नव्हती. सीसीटीव्हीत तसे दिसत नाही, असे आढळराव यांनी सांगितले.  (Former MP Shivarijarav Adhalrao Patil criticizes MLA Dilip Mohite)

या प्रकरणाचा राज्यातील महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. कारण इतर सर्व ठिकाणी आघाडीतील घटक पक्षांमध्ये परस्पर सामंजस्य आहे. पुणे जिल्ह्यातही सर्व तालुक्यांमध्ये एकमेकांचे चांगले संबंध आहेत. फक्त खेड तालुक्यातच नेहमी समस्या येते, त्याचे कारण दिलीप मोहिते असून त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने कारवाई करावी अशी मागणी यांनी केली. खेड पंचायत समितीची मंजूर असलेली नवीन इमारत ठरलेल्या ठिकाणीच व्हावी, याचा आग्रह शिवसेनेने धरला. आमदार मोहिते यांना तसे व्हावयास नको आहे. त्यासाठी स्वतःची सत्ता पंचायत समितीत आणावयाची आहे. त्या कारणावरूनच त्यांनी हे सर्व खालच्या पातळीचे राजकारण केले, असे ते म्हणाले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com