पार्टीला विरोध केल्याने पोलिस अधिकाऱ्याचा नंगानाच; शिवागीळ करत पाच जणांना बेदम मारहाण 

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या आवारातही पन्नासहून अधिक नागरीकांना दीड तासाहून अधिक काळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली.
Five civilians were beaten by a police officer for opposing the party
Five civilians were beaten by a police officer for opposing the party

लोणी काळभोर (जि. पुणे) : लॉकडाऊन (Lockdown) काळात ‘सेंड ऑफ’ची दारूची पार्टी (Liquor party) करणाऱ्यास विरोध केल्याने जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलातील एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने (Senior police officer) लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बड्या गृहनिर्माण संस्थेत पाच तासांहून अधिक काळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, अश्लिल नाच केला. तसेच, पार्टीला विरोध करणाऱ्या पाचहून अधिक जणांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. १७ मे) रात्री घडल्याचे उघड झाले. (Five civilians were beaten by a police officer for opposing the party)

याहून धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मद्यपी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या आवारातही पन्नासहून अधिक नागरीकांना दीड तासाहून अधिक काळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समक्ष घडूनही त्या अधिकाऱ्याविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे लोणी काळभोर पर्यायाने पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

जिल्हा पोलिस दलातील एक वरिष्ठ पोलिस अधिकारी मागील तीन वर्षांपासून लोणी काळभोर येथील एका बड्या गृहनिर्माण संस्थेतील एका सदनिकेत भाड्याने राहत होते. त्या अधिकाऱ्याची लोणी काळभोरपासून दूरच्या पोलिस ठाण्यात बदली झाल्याने ते मंगळवारी (ता. १८ मे) भाड्याची सदनिका सोडून परगावी राहण्यास जाणार होते. ही संधी साधून त्या अधिकाऱ्याने लोणी काळभोर परिसरातील काही माननीय मित्रांसाठी सोमवारी रात्री राहत्या घरातच संगीत पार्टीचे नियोजन केले होते. मात्र, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पार्टी सुरु होताच लॉकडाऊन असल्याचे सांगत त्या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व काही नागरीकांनी त्या अधिकाऱ्यास पार्टी करु नये, अशी विनंती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पार्टीस विरोध करणाऱ्या नागरीकांना अधिकाऱ्याने आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगत पार्टी थांबविण्यास नकार दिला. 

दरम्यान, या गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशांना समजताच पन्नासहून अधिक नागरीक संस्थेच्या मोकळ्या जागेत जमा झाले. नागरीक जमल्याचे समजताच त्या मद्यपी अधिकाऱ्याने नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर काहींनी संबंधित अधिकाऱ्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र दारुच्या नशेत असलेल्या या अधिकाऱ्याने पाचहून अधिक रहिवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व सर्वांसमोर अश्लिल नाच करण्यास सुरूवात केली. अधिकारी ऐकत नसल्याचे लक्षात येताच या रहिवाशांनी लोणी काळभोर पोलिस ठाणे गाठले. तेथील अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. रहिवाशी पोलिसांना माहिती देत असतानाच मद्यधुंद अवस्थेतील पोलिस अधिकारीही पोलिस ठाण्यात पोचले. 

पोलिस ठाण्यात येताच त्याने अधिकाऱ्याने आवारातच रहिवाशांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावर ठाण्यात उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने मद्यपी पोलिस अधिकाऱ्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही त्या अधिकाऱ्याने तक्रार देणाऱ्या रहिवाशांना शिवीगाळ करणे सुरुच ठेवले. रहिवाशी तक्रार देण्यावर ठाम असल्याचे लक्षात येताच मद्यपी पोलिस अधिकाऱ्याने लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका स्वयंघोषीत दादाला ठाण्यात बोलावून घेतले. स्वयंघोषीत दादा पोलिस ठाण्यात येताच लोणी काळभोर पोलिसांनी रहिवाशांना मद्यपी पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करतो, असे सांगून घरी पाठवले. मात्र, मंगळवारी दुपारी बारापर्यंत तरी संबंधित अधिकाऱ्याच्याविरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नव्हती. 

स्वयंघोषीत दादाचे पोलिसांशी कसले संबंध
 
मद्यपी पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी मध्यस्थी करणाऱ्या स्वयंघोषीत दादावर लोणी काळभोर पोलिसात खून, खुनाचा प्रयत्न व हाणामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊन काळात दारुच्या नशेत पाच तासांहून अधिक काळ गोंधळ, पाचहून अधिक नागरिकांना मारहाण व शिवीगाळ, पोलिस ठाण्यात दीड तासाहून अधिक काळ गोंधळ घालणाऱ्या मद्यपी अधिकाऱ्यावर केवळ स्वयंघोषीत दादामुळे गुन्हा दाखल केला जात नाही, ही बाब खटकणारी आहे. महिनाभरापूर्वीच लोणी काळभोर येथील एका सहकारी बॅंकेच्या जेष्ठ संचालकास मारहाण होऊनही, लोणी काळभोर पोलिसांनी दखल न घेतल्याने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली होती. त्यात रात्रीच्या प्रकरणामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या पर्यायाने पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही :  वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी

याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, पार्टी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन मद्यपी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून पाच जणांना बेदम मारहाण व शिवीगाळ, गोंधळ घातला ही बाब खरी आहे. मात्र, संबंधित गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशी तक्रार देण्यास पुढे न आल्याने तक्रार दाखल झालेली नाही. शिवीगाळ व मारहाण झालेले नागरीक तक्रार देण्यास तयार असतील, तर पोलिस केव्हाही तक्रार दाखल करुन घेण्यास तयार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com