अधिकारी दाद देईनात म्हणून उपविभागीय कार्यालयासमोरच शोलेस्टाईल आंदोलन  - Farmers climb on a water tank to protest the ring road | Politics Marathi News - Sarkarnama

अधिकारी दाद देईनात म्हणून उपविभागीय कार्यालयासमोरच शोलेस्टाईल आंदोलन 

राजेंद्र सांडभोर 
मंगळवार, 6 जुलै 2021

रिंगरोड जमीन भूसंपादनविरोधात घोषणा देत आंदोलन सुरू केले.

राजगुरूनगर :  पुणे (Pune) रिंगरोड आणि पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी जमीन भूसंपादनाविरोधात, खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीने, खेड उपविभागीय कार्यालयासमोर आठवडाभर चक्री उपोषण आंदोलन केले. उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी त्याची दखल न घेतल्याने, खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारे यांनी आज सकाळी ७ वाजल्यापासून राजगुरूनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले. खेड उपविभागीय कार्यालयासमोरच ही पाण्याची टाकी आहे. (Farmers climb on a water tank to protest the ring road) 

येथील वाडा रस्त्यावर गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या दोन उंच टाक्या आहेत. त्यातील एका टाकीवर ते भल्या सकाळीच चढू लागले. त्यांना नगरपरिषदेचे कर्मचारी संतोष सावंत व इतरांनी अडविण्याचा प्रयत्न केला, पण ते झटापट करून टाकीच्या जिन्यावर चढले. अडविल्यास खाली उडी मारीन अशी धमकी त्यांनी दिली. शेवटी ते टाकीवर चढलेच. त्यांनी बरोबर आंदोलनाचा बॅनर नेला. तो टाकीवर लावला आणि रिंग रोड जमीन भूसंपादनविरोधात घोषणा देत आंदोलन सुरू केले.  

हेही वाचा : नाणारचे समर्थन करत शेकडो शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

सकाळी सकाळी हा प्रकार पाहून पाण्याची टाकी चौकात लोकांची मोठी गर्दी झाली. पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांसह पोलीस लवाजमा तेथे हजर झाला. ते वारंवार पाटीलबुवा गवारे यांना खाली उतरण्याचे आवाहन करीत होते. पण गवारे कोणाचे ऐकत नव्हते. कोणी वर चढून आल्यास खाली उडी मारीन अशी धमकी ते देत होते. तसेच टाकीच्या लोखंडी रेलींगवर वारंवार चढत होते. त्यामुळे पोलीस व कार्यकर्तेही हतबल झाले. उपविभागीय अधिकाऱ्यांना येथे बोलवा, असे गवारे म्हणत होते. 

आम्ही आठवडाभर येथे चक्री उपोषणास बसलो आहोत. पण उपविभागीय अधिकारी आम्हाला साधे भेटावयासही आले नाहीत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील वगळता कोणी राज्यकर्त्यांकडून आमची दखल घेतली नाही. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले तरी, अधिकारी मोजण्या करीत आहेत. आम्हाला लेखी आदेश नाहीत, असे उपविभागीय अधिकारी चव्हाण सांगत आहेत. म्हणून आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत. वेळप्रसंगी इंद्रायणीत जलसमाधी आंदोलन करणार आहोत, असे पाटीलबुवा गवारे यांनी सोमवारी रात्री सांगितले होते. मात्र आज सकाळी अचानक त्यांनी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले. 

हेही वाचा : भास्कर जाधव यांनी अनिल कुंबळेचे रेकॅार्ड मोडले...एकाच इनिंगमध्ये १२ बळी!

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ( एमएसआरडीसी ) विकसित करण्यात येत असलेल्या पुणे रिंगरोडसाठी आणि पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी, खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, च-होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या १२ गावांतील जमिनी संपादित करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचा या भूसंपादनाला विरोध आहे. म्हणून या १२ गावांच्या शेतकरी प्रतिनिधींनी, २९ जूनपासून खेड उपविभागीय कार्यालयासमोर चक्री उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्याने या आठवड्यात प्रखर आंदोलन करणार आणि पुढील टप्प्यात इंद्रायणी नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला होता.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख