तुम्ही इंदापूरचे लोकप्रतिनिधी असला तरी सोलापूरचे पालकमंत्री असल्याचे भान ठेवा - Even if you are the people's representative of Indapur, remember that you are the Guardian Minister of Solapur :Vijay Kumar Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

तुम्ही इंदापूरचे लोकप्रतिनिधी असला तरी सोलापूरचे पालकमंत्री असल्याचे भान ठेवा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

पुणेकरांकडून सोलापूर जिल्ह्याला नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.

सोलापूर : कोविड लशीचा सोलापूरचा वाटा कमी करून तो पुण्याकडे वळविला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला. तसेच, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे प्रतिनिधित्व करत असले तरी ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, याचे भान त्यांनी ठेवावे, असा टोलाही त्यांनी भरणे यांना लगावला आहे. 

सोलापूर शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावसंदर्भात बुधवारी (ता. 21 एप्रिल) महानगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीमध्ये शहरातील कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीसंदर्भात आढावा घेण्यात आला. 

देशमुख म्हणाले की, सोलापूर शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. कोरोनाच्या या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून नेटाचे प्रयत्न केले जात आहेत. पण अशा कठिण परिस्थितीमध्ये बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्‍यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन असो, की लसीकरणासाठी डोस देताना सोलापूर शहर-जिल्ह्याचा वाटा कमी करून तो पुण्याकडे वळविला जात आहे. मागील चाळीस वर्षापासून पुणेकरांकडून सोलापूर जिल्ह्याला नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे, असा आरोपही या वेळी आमदार देशमुख यांनी केला.

या बैठकीनंतर आमदार देशमुख, महापौर यन्नम, आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी बागेवाडीकर आयुर्वेदिक दवाखान्याची पाहणी केली. हा दवाखाना कोविड सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. तसेच, हैदराबाद रोडवरील शिवदारे मंगल कार्यालयसुद्धा अधिग्रहित करण्याचा विचार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक शिवानंद पाटील, संजय कोळी, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते हे या या बैठकीला उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख