रामचंद्र ठोंबरेंना धक्का; कुरघोडीमुळे जिल्हा बॅंक प्रतिनिधी म्हणून निवड होऊ शकली नाही  - Due to political maneuvering, Ramchandra Thombre could not be elected as the District Bank Representative | Politics Marathi News - Sarkarnama

रामचंद्र ठोंबरेंना धक्का; कुरघोडीमुळे जिल्हा बॅंक प्रतिनिधी म्हणून निवड होऊ शकली नाही 

बंडू दातीर 
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

आतापर्यंतच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ते स्वतःच प्रतिनिधी म्हणून जात होते.

पौड (जि. पुणे) : कुरघोडीच्या राजकारणाचा पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे (कात्रज) माजी अध्यक्ष, सहकारातील मुरब्बी नेते रामचंद्र ठोंबरे यांना गावातच (जामगाव, ता. मुळशी) धक्का बसला आहे. कारण, पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडीसाठी मतदान करणारे प्रतिनिधी म्हणून ठोंबरेना जायचे होते. मात्र, श्रीराम विविध कार्यकारी विकास सोसायटीतील सहा सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही.

ठोंबरे यांच्या गावातच जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडीसाठी प्रतिनिधी नसणार आहे. जामगावच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे तालुक्‍यातील 46 पैकी 45 सोसायट्यांनाच मतदानाचा अधिकार असणार आहे. 

जामगावच्या विकास सोसायटीवर स्थापनेपासूनच म्हणजे गेली वीस वर्षांपासून रामचंद्र ठोंबरे यांची पकड होती. सोसायटीत बारा सदस्य असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने सध्या अकरा सदस्य आहेत. ठोंबरेच या सोसायटीचे चेअरमन राहिले असून आतापर्यंतच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ते स्वतःच प्रतिनिधी म्हणून जात होते.

या वेळी प्रतिनिधी म्हणून नवीन व्यक्तीला संधी द्यावी, असे इतर संचालकांनी ठरविले. मात्र त्याबाबत ठोंबरे गटाकडून कुरघोडीचे राजकारण खेळले गेल्याने या सोसायटीतील वसंत सुर्वे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय सुर्वे, उपाध्यक्षा नंदा सुर्वे, सोपान डोख, अनंता ढाकूळ, चंद्रकांत ओव्हाळ यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्याबाबत रविवारी (ता. 21 फेब्रुवारी) ग्रामपंचायतीत बैठक बोलवण्यात आली होती. तसा अजेंडाही संचालकांना पाठविण्यात आला होता. तथापि बहुमत असतानाही सुर्वे गटाचे सहाही सदस्य उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे प्रतिनिधीची निवड होवू शकली नाही. तथापि गेली वर्षांपासून सुरू असलेल्या या निवड प्रक्रियेचा सोमवारी (ता. 22 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. परंतु आज प्रतिनिधी न निवडला गेल्याने जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडीसाठी या सोसायटीला आता मुकावे लागणार आहे. 

ठोंबरेंनी आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न केला 

प्रतिनिधी निवडीच्यादरम्यान रामचंद्र ठोंबरे यांनी आमच्या सुर्वे बंधूंमधील एकाला एक, दुसऱ्याला वेगळे सांगून वाद लावण्याचा प्रयत्न केला. तथापि सोसायटीतील आम्ही सर्व सुर्वे सदस्य एकच आहोत. ठोंबरे यांच्याकडे आजतागायत ग्रामपंचायत, तंटामुक्ती, विकास सोसायटी, साखर कारखाना, दूध संघ ही सहकारातील सर्वच पदे आहेत. मग इतरांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का. त्यामुळे बहुमत असतानाही आम्ही या निवडीवर बहिष्कार घातला, असे श्रीराम सोसायटीचे सुर्वे गटाचे संचालक वसंत सुर्वे यांनी सांगितले. 

...म्हणून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला 

जिल्हा बॅंकेच्या संचालकांना मतदान करण्यासाठी मला प्रतिनिधी म्हणून जायचे आहे. नंतर जिल्ह्यातून मलाच उमेदवारी मिळणार आहे. असे खोटेनाटे सांगत रामचंद्र ठोंबरे यांनी प्रतिनिधी होण्यासाठी आग्रह धरला होता. त्यात कुरघोडीचे राजकारण करीत त्यांनी आमच्याच भावकीत वाद लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असा आरोप श्रीराम सोसायटीच्या उपाध्यक्ष नंदा सुर्वे यांनी केला. 

आमच्या विकास सोसायटीच्या प्रतिनिधीसाठी मला स्वारस्य नव्हते. इच्छूक दोन्ही सुर्वे संचालकांनी एकच नाव द्यावे, असे मी सूचविले होते. परंतु त्यांच्यात एकमत झाले नाही. आजच्या निवड बैठकीला ते आले नाहीत. त्यामुळे कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली. 
- रामचंद्र ठोंबरे, 
चेअरमन, श्रीराम विकास सोसायटी 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख