कोरोनाच्या रिपोर्टसाठी मजुरांकडे लाच मागणारा डॉक्‍टर अटकेत  - Doctor arrested for soliciting bribe from laborers for corona report | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोनाच्या रिपोर्टसाठी मजुरांकडे लाच मागणारा डॉक्‍टर अटकेत 

प्रफुल्ल भंडारी 
सोमवार, 1 मार्च 2021

लाच प्रकरणात अन्य काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाची पडताळणी केली जात आहे. 

दौंड : पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरातील उपजिल्हा रूग्णालयात रोजंदारीवरील मजुरांकडे कोरोना विषाणू तपासणी अहवाल देण्याकरिता प्रत्येकी शंभर रूपये मागून दीड हजार रूपयांची लाच घेणाऱ्या डॉक्‍टर मिलिंद कांबळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. 

दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कंपनीतील कंत्राटदाराने 19 रोजंदारीवरील मजुरांना कोरोना तपासणी करण्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.

रॅपिड अँटिजेन डिटेक्‍शन किटद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल अवघ्या अर्धा तासात प्राप्त होतो. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद दामोदर कांबळे (वय 38, रा. कात्रज, पुणे) याने तपासणीचा अहवाल देण्याकरिता प्रत्येकी शंभर रूपये प्रमाणे एकूण एकोणीसशे रूपयांची मागणी केली होती. 

दरम्यान या मजुरांच्या पर्यवेक्षकाने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार सापळा रचल्यानंतर डॉ. मिलिंद कांबळे याने एकोणीसशे रूपयांऐवजी तडजोडीनंतर दीड हजार रूपयांची मागणी केली. एक मार्च रोजी उपजिल्हा रूग्णालयात डॉ. कांबळे यास ही लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. 

डॉ. मिलिंद कांबळे हा उपजिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी पध्दतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सर्व 19 मजुरांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच प्रकरणात अन्य काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाची पडताळणी केली जात आहे. 

दौंड तालुक्‍यात 105 सक्रिय रूग्ण 

दौंड तालुक्‍यात 29 एप्रिल 2020 पासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत 3486 जणांना कोरोनाची बाधा होऊन त्यापैकी 3309 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 81 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालुक्‍यात सध्या 105 बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख