झेडपीच्या शाळेत शिकलेले दिलीप वळसे पाटील झाले राज्याचे गृहमंत्री

शपथविधीवेळीच त्यांच्याकडे हे जबाबदारी सोपविण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार होता.
Dilip Walse Patil, who was educated in ZP's school, became the Home Minister of the state
Dilip Walse Patil, who was educated in ZP's school, became the Home Minister of the state

मंचर (जि. पुणे)  ः उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आणि ती जबाबदारी आंबेगावचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विश्वासातील असल्याने शपथविधीवेळीच त्यांच्याकडे हे जबाबदारी सोपविण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार होता. मात्र, त्या वेळी वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिल्याने ते पद देशमुखांकडे सोपविण्यात आले होते. आता पुन्हा गृहमंत्रिपदाची धुरा ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या वळसे पाटलांच्या हाती आली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात यावे, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले. त्यानंतर वळसे पाटील यांचे गाव असलेल्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील नागरिकांनी एकमेकाला पेढे वाटून व फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. सोशल मीडिया व विविध चॅनेलवर गृहमंत्री पदाची जबाबदारी वळसे पाटील यांच्यावर येणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या घडामोडीवर गावकऱ्यांचं लक्ष होतं. वळसे पाटील गृहमंत्री झाल्याची बातमी संध्याकाळी येऊन धडकली आणि निरगुडसरच्या मुख्य चौकात ग्रामपंचायत सदस्य आनंदराव वळसे पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज हांडे देशमुख, राहुल हांडे देशमुख, मिलिंद वळसे पाटील, डॉ.अतुल साबळे, रमेश टाव्हरे, रामदास टाव्हरे, नीलेश पडवळ, हनुमंत टाव्हरे आदी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकाला पेढे भरून आनंद साजरा केला.

दिलीप वळसे पाटील यांचे प्राथमिक शिक्षण निरगुडसर येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत, तर गावातीलच पंडित नेहरू विद्यालयात इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. वडील माजी आमदार दत्तात्रेय वळसे पाटील यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. मुंबईत उच्च शिक्षण घेत असताना शरद पवार यांचे स्वीय्य सहायक म्हणून काम केले आहे. त्यानंतरही पवारांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. 

वळसे पाटील हे 1990 पासून आतापर्यंत सात वेळा विधानसभेवर वाढत्या मताधिक्याने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आजपर्यंत त्यांनी विधानसभा अध्यक्षपदासह विविध खात्याचे मंत्रिपद समर्थपणे सांभाळले आहे. गृहमंत्र्यांवर हप्तेवसुलीसारखा गंभीर आरोप झाला असून तो पुसून या विभागाची उंची वाढविण्याचे आव्हान वळसे पाटील यांच्यासमोर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com