वळसे पाटील-आढळरावांचे कार्यकर्ते तब्बल 16 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर 

राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील राजकीय संषर्घ अख्ख्या राज्याला माहीत आहे.
Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao's activists on the one platform after 16 years
Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao's activists on the one platform after 16 years

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे विळ्या भोपळ्याचे वैर सर्वश्रुत आहे. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील राजकीय संषर्घ अख्ख्या राज्याला माहीत आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधून विस्तवही जात नाही. मात्र, महाविकास आघाडीने भल्या भल्या विरोधकांना एका छताखाली आणले आहे. त्याच पद्धतीने आंबेगाव तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते तब्बल 16 वर्षांनंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. एकमेकांच्या शेजारी बसून प्रचाराची भाषणे करत होते. 

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघातील जयंत आसगावकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचर (ता. आंबेगाव) येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे नेते राजाराम बाणखेले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, देवदत्त निकम, माजी आमदार पोपटराव गावडे, विष्णू हिंगे, विवेक वळसे-पाटील, मानसिंग पाचुंदकर, कॉंग्रेसचे नेते राजू इनामदार, प्रदीप वळसे पाटील, रमेश खिलारी आदी दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर होते. हे तीनही पक्षाचे नेते प्रथमच एका व्यासपीठावर आले आहेत. 

राजाराम बाणखेले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्षपद व अरुण गिरे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असताना हे दोन नेते वळसे पाटील यांच्या अत्यंत जवळचे व निर्णय प्रक्रियेतील होते. पण, सहा वर्षांपूर्वी या दोन्ही नेत्यांनी वळसे-पाटील यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करून आढळराव पाटील यांना साथ दिली. 

गिरे यांनी तर गेल्या विधानसभा निवडणुकीत वळसे-पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येही शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने होते. प्रत्येक निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.

पण, एका वर्षापूर्वी राज्यात राजकीय चमत्कार झाला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आले. वळसे-पाटील कॅबिनेट मंत्री झाले. राज्य पाताळीवर नेत्यांची मने जुळली. पण आंबेगाव तालुक्‍यात वर्षभर राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते राजकीय कार्यक्रमानिमित्त कोठेही एकत्र आल्याचे पाहावयास मिळत नव्हते. 

मंचर येथे सोमवारी (ता. 23 नोव्हेंबर) पदवीधर व शिक्षक संघाच्या निवडणुकीनिमित्त हे नेते एकत्र आले. वक्‍त्यांची भाषणे सुरू असताना वळसे पाटील व राजाराम बाणखेले तसेच देवदत्त निकम, अरुण गिरे व विष्णू हिंगे यांच्यामध्ये सुरु असलेली कुजबुजही उपस्थितांनी पाहिली. 

शिवसेना नेत्याने दिला वळसे पाटलांना शब्द 

राजाराम बाणखेले यांनी तर वळसे-पाटील यांना जाहीररित्या शब्द दिला की, या निवडणुकीत सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून मतदान करतील. उमेदवार अरुण लाड हे सांगली येथील माझ्या सासरवाडीचे असून ते जवळचे नातेवाईकदेखील आहेत. त्यांची व माझी भेट झालेली आहे. असे सांगितल्यानंतर उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजाभाऊ यांच्याकडे कटाक्ष टाकून स्मितहास्य केले. दिलीप वळसे पाटील यांनीही भाषणात राजाभाऊ यांचा तीन वेळा उल्लेख केला. 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांचे जमलेले सूत हा तालुक्‍यात चर्चेचा विषय झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com