नव्या पुण्याचे देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार - Devendra Fadnavis of New Pune is the sculptor-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नव्या पुण्याचे देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार

सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी, ता. हवेली) सरचिटणीस, भाजप, पुणे जिल्हा  जयेश शिंदे (विठ्ठलवाडी, ता. शिरुर) जिल्हाध्यक्ष, भाजप कामगार आघाडी
गुरुवार, 22 जुलै 2021

देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राची धुरा सांभाळतील, यामध्ये आमच्या मनात कुठलीही शंका नाही.  

पुणे : कुशाग्र बुद्धिमत्ता, विरोधकांची भंबेरी उडविणारा आवेश, म्हणणे खोडताच येणार नाही, असा कमालीचा वास्तववादी युक्तीवाद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जगण्यातील सात्विकता, सृजनशीलता आणि भल्या-भल्या राजकारण्यांना पुरून उरण्याची जिगर. महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकीय इतिहासात (स्व.) यशवंतराव चव्हाणांनंतर (Yashwantrao Chavan) एवढे प्रगल्भ मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रूपाने लाभले. अगदी कमी वयात मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राची धुरा सांभाळतील, यामध्ये आमच्या मनात कुठलीही शंका नाही.  

देवेंद्र फडणवीस हे म्हणजे सध्याच्या सोशल मीडियातील सक्रीय युवापिढीचे सर्वात लाडके, आवडते नेते. शिवसेना-भाजपच्या युती सरकारने १९९५ मध्ये स्थापन केलेल्या ‘पीएमआरडीए’ ला २०१४ मध्ये कार्यान्वित करून संपूर्ण पुण्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मोठा निर्णय घेतला, त्यामुळे नव्या पुण्याचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीसच ठरतात, हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते.

हेही वाचा : वैजापूरला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग म्हणजे देवेंद्र फडणवीस. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते सलग पाच वर्षे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदही फडणवीस यांनी तेवढ्याच ताकदीने सांभाळून राज्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. अर्थात, राज्याच्या इतिहासात स्वत:च्या नेतृत्वावर १०५ आमदारांची भली मोठी भिंत उभी करणारा राज्यातील एकमेव नेता म्हणूनही त्यांची किर्ती आहे. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांची आजची कारकिर्दही इतरांना अनुकरणीय ठरावी, अशीच असल्याचा महाराष्ट्राचा अनुभव आहे. 

सध्या पुणे शहरात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जे ‘शिल्पकार नव्या पुण्याचे...नेतृत्व नव्या महाराष्ट्राचे....!’ हे फलक झळकत आहेत, ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावतीचा म्हणावी लागेल. कारण, पुण्याचा परिपूर्ण विकास करायचा असेल तर त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा हवी होती. औद्योगिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक अशा सगळ्याच स्तरावर पुणे विकासात अग्रस्थानी ठेवण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि गावोगावच्या ग्रामपंचायती यावर विसंबून राहता येणार नाही, हे युती सरकारने १९९५ मध्ये ठरविले आणि मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन केले. 

पुढे सरकार बदलले आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला ‘पीएमआरडीए’ची कार्यवाही करता आली नाही. केवळ अध्यक्ष कोणत्या पक्षाचा करायचा, या एकाच कारणाने तब्बल १५ वर्षे पीएमआरडीए कागदावरच राहिले. पुढे २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होताच तिसऱ्याच महिन्यात पीएमआरडीएचे अध्यक्ष स्वतः होत पुण्यात औंध, पिंपरी-चिंचवड आणि वाघोलीत कार्यालय सुरू केले. पीएमआरडीएचे कामकाज सुरू करून देत अध्यक्षपदी तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांची नियुक्ती केली. पुढे ८२५ गावांना त्यात समाविष्ट करून पुणे शहराच्या विविध विकास योजनांबरोबरच रिंगरोडची कार्यवाही याद्वारे सुरू झाली. अर्थात शासनस्तरावर पीएमआरडीएसाठी स्वतंत्र निधीप्रावधान सुरू झाल्याने पुण्यासाठी हा एवढा मोठा निर्णय ज्यांनी केला, ते देवेंद्र फडणवीसच ‘शिल्पकार नव्या पुण्याचे..!’ आहेत, हे आता कुणीही सांगू शकेल. 

अर्थात १०५ आमदारांच्या राज्यातील सर्वात बलाढ्य पक्षाचा हा नेता राज्यात काहीही राजकीय घडामोडी करु शकतो आणि कधीही मुख्यमंत्री होऊ शकतो, हा विश्वास केवळ आम्हासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कट्टर भाजप कार्यकर्त्यांनाच नाही, तर सर्व विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषकांनासुद्धा आहे. राज्यात त्याची चर्चा कायम असते.

देवेंद्र फडणवीस यांनी  व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली असून डी. एस. ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमासुद्धा केला आहे. कायद्याचे शिक्षण (एल.एल.बी) त्यांनी नागपूर विद्यापीठापूतन घेतले आहे. फडणवीस ह्यानी १९८९ मध्ये भाजयुमोचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून आपल्या राजकीय इनिंगची सुरुवात केली.

नागपूर शहर पश्चिम विभागाचे १९९० मध्ये ते भाजपचे पदाधिकारी बनले. ते १९९२ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहराचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांना १९९४ मध्ये भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले. ते १९९९ पासून आजतागायत विधानसभेचे सदस्य आहेत. तत्पूर्वी सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर बनले हेाते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी त्यांना २००१ मध्ये मिळाली.

राज्य भाजपचे सरचिटणीस ते २०१० मध्ये बनले. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत म्हणजे २०१३ मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदही त्यांच्याकडे आले. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. त्यानंतर २०१९ मध्ये १०५ आमदारांच्या मोठ्या पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. दुर्दैवाने काही कारणामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. पण, विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही ते तेवढ्याच तडफेने ते सांभाळत आहेत.
 
विधिमंडळाची अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती आदी समित्यांवर फडणवीस यांनी काम केले आहे.

वैशिष्ट्ये
►१९८९ मध्ये राजकारणात प्रवेश
►१९९२ व १९९७ मध्ये नागपूर महापालिकेत सलग दोनदा निवडून आले
►आजवरचे जगातील दुसरे तरुण महापौर (नागपूर)
►महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेयर इन काऊन्सिल’ चा बहुमान मिळविणारे ते पहिलेच महापौर.

बहुमान
►कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
►राष्ट्रीय, आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
►रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
►मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
►नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख