आता आमचा अंत पाहू नका...

कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात आली आहे, शहरातील रुग्णसंख्या लक्षणीय घटली असून शहराची ठप्प असलेली बाजारपेठ पुन्हा सुरु करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
  Baramati .jpg
Baramati .jpg

बारामती : शहरातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या झपाट्याने घटू लागल्याने आता बारामतीचे (Baramati) जनजीवन पूर्वस्थितीमध्ये आणावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात आली आहे, शहरातील रुग्णसंख्या लक्षणीय घटली असून शहराची ठप्प असलेली बाजारपेठ पुन्हा सुरु करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. (Demand to start market in Baramati) 

बारामतीत काल 561 नमुने तपासले गेले, त्या पैकी 87 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून पॉझिटीव्हीटीचा दर आता 15 टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. बारामती शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 29 वर आली असून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 58 आहे. एकूण रुग्णसंख्या व बरे होणा-यांची संख्या यातील तफावतही वेगाने कमी होऊ लागली आहे. 

तपासणीचीही संख्या वेगाने कमी होत असून पॉझिटीव्ह येणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. जे नागरिक पॉझिटीव्ह येत आहेत त्यातील बव्हतांश जणांना अतिसौम्य लक्षणे दिसून येत आहेत. बारामतीत खाजगी रुग्णालयातील 1116 बेडपैकी 471 रुग्ण दाखल असून उर्वरित 645 बेड रिकामे आहेत. ऑक्सिजनचे 619 बेडपैकी 397 बेड आज रिकामे आहेत. आयसीयुच्या 112 बेडपैकी 61 बेड रिकामे आहेत. ऑक्सिजनविरहीत 509 बेडपैकी 373 बेड रिकामे आहेत. तीन कोविड केअर सेंटरही प्रशासनाने बंद केलेली आहेत. 

बारामतीत 5 एप्रिल पासून लॉकडाऊन सुरु आहे. टप्याटप्याने त्याची व्याप्ती वाढवली गेली. आता जवळपास दोन महिने बाजारपेठ बंद असल्याने बारामतीचे जनजीवन ठप्प झाले असून त्याचा अर्थचक्रावर विपरीत परिणाम झाला आहे. विविध दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तर ज्यांचे पोट हातावर आहे अशा अनेक कामगारांवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. लग्नसराईचा काळ निघून गेल्याने व्यापारी वर्गाचे कमालीचे नुकसान झाले आहे. 

दोन महिने व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य केलेले आहे, दुकाने बंद राहिल्याने उत्पन्न थंडावले मात्र, सर्व खर्च व कर कायमच असल्याने सर्वांवरच परिणाम झाला आहे. कोरोनाचे संकटही आता दूर झालेले असल्याने शासनाने व्यापाऱ्यांचा अंत बघू नये, अशी बारामतीतील व्यापाऱ्यांची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com