राज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत  

मागील विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री भरणे यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही तर काठावर पराभव झाल्यामुळे पाटील देखील नाऊमेद झाले नाहीत.
 Dattatreya Bharane's invitation to the disgruntled Shah family join the NCP .jpg
Dattatreya Bharane's invitation to the disgruntled Shah family join the NCP .jpg

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती व जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) यांनी आक्रमक होत राजकीय जुळवाजुळवीस प्रारंभ केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे राजकीय विरोधक माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मात्र सूचक मौन बाळगले आहे. आगामी राजकीय फिव्हर लक्षात घेता राजकारणातील किंगमेकर सक्रिय झाले आहेत. (Dattatreya Bharane's invitation to the disgruntled Shah family join the NCP) 

मागील विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री भरणे यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही तर काठावर पराभव झाल्यामुळे पाटील देखील नाऊमेद झाले नाहीत. त्यामुळे दोघामध्ये प्रत्येक मुद्द्यावर कलगीतुरा रंगतो आहे. भरणे यांचे चिरंजीव श्रीराज आणि पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन व कन्या, जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी राजकारणात पाऊल टाकल्याने ही लढाई पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. सलग २० वर्ष मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव पाटील यांना आहे. भाजपचा पश्चिम महाराष्ट्र व सहकारात दबदबा वाढविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या कौशल्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. मात्र, त्यांना सत्तेचे पद नसल्याने कार्यकर्ते व संस्था सांभाळताना पाटील यांना मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे आगामी निवडणुका मंत्री भरणे यांच्या प्रतिष्ठेची, तर पाटील यांच्या अस्तित्वाची ठरणार आहे. त्यामुळे त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आणि इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, त्यांचे चिरंजीव संग्रामसिंह, भोडणीचे सचिन हंगे, आमदारकीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेलेले माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सपकळ यांना दत्तात्रेय भरणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आपली राजकीय ताकद वाढवली आहे. त्याचाच एक ट्रेलर म्हणून भरणे यांनी दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांचे निष्ठावान सहकारी, कर्मयोगी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा, त्यांचे पुत्र तथा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, नगरसेवक भरत शहा यांची इंदापुरात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत संशयकल्लोळ वाढविला आहे. इंदापूर शहराचा गतीने विकास होण्यासाठी त्यांनी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. गोकुळदास शहा, मुकुंद शहा, अंकिता शहा व भरत शहा हे काँग्रेसला मानणारे कुटुंब असून अंकिता शहा या काँग्रेसच्या तिकिटावर नगराध्यक्षा झाल्या आहेत.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मयोगी कारखाना, इंदापूर नगरपरिषदेसाठी गोकुळदास शहा, (कै.) सुरेशदास शहा व शहा परिवाराचे मोठे योगदान आहे. कुटुंबप्रमुख (कै.) नारायणदास शहा हे स्वातंत्र्यसैनिक होते. ते गांधीवादी, पुरोगामी व समाजवादी विचाराचे होते. त्यामुळे शहा कुटुंबाचे शहर, तालुका विकासात निर्विवाद योगदान असून त्यांना मानणारा वर्ग आहे. नगराध्यक्ष पदावर काम करत अंकिता शहा यांनी नगरपरिषदेस राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळवून देत इंदापूरचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवले आहे. इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्षपद, कर्मयोगी कारखान्याचे संचालकपद, नगरपरिषद उपनगराध्यक्षपद व नंतर नगरसेवक पदावर काम करणारे भरत शहा यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त कारभारास त्यांनी प्राधान्य दिल्याने तसेच राजकारणात उशिरा येऊन हर्षवर्धन पाटील यांच्याजवळ गेल्याने त्यांना अनेक हितशत्रू तयार झाले. मात्र, त्यांनी इतरांना संधी हे कारण पुढे करून इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. 

इंदापूर शहरातील शहा कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेऊन भरणे यांनी योग्यवेळी शहा कुटुंबास राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी मधाळ जाळे फेकले आहे. दुसरीकडे, पाटील यांची गनिमी कावा पध्दतीने वाटचाल सुरू आहे. मात्र, त्यात सोशल इंजिनिअरिंगचा अभाव आहे. त्यांच्याभोवती बहुतांशी जनमत नसलेल्या नेत्यांचे कोंडाळे आहे. याच कारणांनी त्यांना आमदारकीस पराभूत व्हावे लागले. दोनवेळा आमदारकीस पराभव झाल्यानंतर शहा कुटुंबामुळे इंदापूर नगरपरिषद मागील निवडणुकीत ताब्यात राहिल्याने पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा टिकली. मात्र, राजहट्टामुळे शहा कुटुंबांसारखे चांगले कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जात आहेत. शहा कुटुंबीय त्यांनाच अद्याप नेता मानत असून हर्षवर्धन पाटील यांनीही सर्व रुसवेफुगवे, मानापमान दूर करून शहा कुटुंबाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ज्याप्रमाणे निमगाव केतकीचे मच्छिंद्र चांदणे परिवार हर्षवर्धन पाटील यांच्यापासून दूर जात राष्ट्रवादीत गेला. त्यानंतर निमगाव केतकी ग्रामपंचायतही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेली, त्याप्रमाणे इंदापूर नगरपरिषदही राष्ट्रवादीकडे जाण्यास वेळ लागणार नाही.

मंत्री भरणे यांनी तालुक्याच्या विकासासाठी विक्रमी निधी आणला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही. जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी सोनाई परिवाराच्या माध्यमातून ताकद निर्माण केली आहे. मात्र, ते व मंत्री भरणे अनेकवेळा एका व्यासपीठावर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भरणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे देखील मत बेरजेचे राजकारण करताना विचारात घ्यावे लागणार आहे, त्यामुळे भरणे व पाटील यांना जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकत्र ठेवून आपले वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com