पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार ऍड. रूपाली पाटील-ठोबरे यांना मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतून तरुण पदवीधर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत केलेल्या दौऱ्यात घेण्यात आलेल्या मेळाव्याला झालेली गर्दी विरोधकांना विचार करायला लावणारी ठरली.
पाचही जिल्ह्यांत घेण्यात आलेल्या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. सांगली येथील मेळाव्यात पक्षाचे नेते बापू धोत्रे यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी एक लाख रूपयांचा धनादेश दिला.
ऍड. रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या रूपाने मनसेने एक सक्षम आणि चांगला उमेदवार दिला आहे. या मतदारसंघातील तरुणांनी पाटील यांना मतदान करून खंबीरपणे पाठीशी उभे राहावे, असे आवाहन नांदगावकर यांनी केले.
सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी घेतलेल्या मेळाव्याला झालेली गर्दी आणि त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद विरोधकांची धडकी भरायला लावणारी आहे. दौऱ्यात प्राधान्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे ऍड. पाटील-ठोंबरे यांना प्रत्येक ठिकाणी ओळखणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. सर्वच मेळाव्यात अनेक छोट्या-मोठ्या संघटनांनी ऍड. पाटील-ठोंबरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे.
ऍड. पाटील-ठोंबरे यांना मिळणारा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख, तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांची डोकदुखी ठरणार आहे.
या संपूर्ण मतदारसंघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा तरुणवर्ग आहे. अगदी छोट्या गावातदेखील पदवीधर तरुणांमध्ये ठाकरे यांची "क्रेझ' आहे. त्या "क्रेझ'चा फायदा ऍड. पाटील यांना होणार आहे.
बेरोजगारी, तरुण पदवीधरांचे प्रश्न आणि आजवरच्या पदवीधर मतदारसंघातील आमदारांनी दाखवलेल्या नाकर्तेपणावर आपल्या भाषणातून ऍड. पाटील-ठोंबरे नेमकेपणाने बोट ठेवतात. त्यामुळे त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद मोठा असतो.

