राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दत्तात्रेय भरणेंविरोधात पवारांकडे तक्रार - Complaint of big NCP leaders to Pawar against  Dattatreya Bharane | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दत्तात्रेय भरणेंविरोधात पवारांकडे तक्रार

तात्या लांडगे
बुधवार, 9 जून 2021

काही नेत्यांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला व मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला होईल, या हेतूने इंदापूरचे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा देण्यात आली.

आता पालकमंत्री भरणे यांची जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आमची कामे न करता ठरावीक लोकांचीच कामे करतात, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते विश्‍वासात घेत नाहीत, अशी तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यात आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची नावे असल्याची चर्चा आहे. (Complaint of big NCP leaders to Pawar against  Dattatreya Bharane)

पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दत्तात्रेय भरणे यांना साडेचार महिने आचारसंहितेमुळे, तर सात महिने कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यासाठी काहीच निर्णय घेता आले नाहीत. तरीही, जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आमच्याकडे थांबत नाहीत, वेळ देत नाहीत, आम्हाला काहीच कल्पना न देताच बैठका घेतात. बैठकांना आम्हाला बोलवत नाहीत. काही ठरावीक लोकांनाच वेळ देतात. त्यांचीच कामे करतात, अशा स्वरूपाची तक्रार पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याविरुद्ध काही नेत्यांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या पराभवाची जखम वर्धापनदिनी पंढरपूर-मंगळवेढ्यात अधिकच दुखली!

परंतु, आगामी काळात सोलापूर जिल्हा परिषद व सोलापूर महापालिकेची निवडणूक असल्याने सध्या पालकमंत्री बदलणे कठीण आहे, अशी चर्चा मुंबईतील बैठकीत झाल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, मी साधा माणूस असून सर्वसामान्यांसाठी काम करतो. पक्षवाढीचा सातत्याने प्रयत्न करतो. संघटन मजबूत होण्यासाठीच माझा प्रयत्न असतो.

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच नेहमी काम करतो. कोणाचेही मन दुखावण्याचा अथवा त्यांच्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागे कोणताही हेतू नाही, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.  
 
पालकमंत्री पोचले ‘सिल्व्हर ओक’वर

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक, जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन रणनिती आखण्याच्या दृष्टीने मंगळवारी (ता. 8 जून) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांबद्दल त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींची शहानिशा झाली.

दरम्यान, शरद पवार यांनी पालकमंत्र्यांना फोन करून तत्काळ बोलावले. त्यावेळी मंत्रालयात असलेले पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे पवार यांच्या भेटीला निघाले. त्यांनी पालकमंत्र्यांकडून तक्रारींबद्दल विचारले आणि त्यांना सबुरीचा सल्ला दिला. तसेच, सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या पालकमंत्र्यांबद्दल काही तक्रारी आहेत का, अशीही त्यांनी विचारणा केली. त्यावेळी उपस्थित शहरातील पदाधिकाऱ्यांनी काहीच तक्रारी नसल्याचे त्यांना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख