राष्ट्रवादीचे आमदार मानेंविरोधातील याचिका फेटाळली; मोहोळमधील विरोधकांना इंदापुरातून रसद  - The committee rejected the petition filed against MLA Yashwant Mane on the basis of caste certificate | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे आमदार मानेंविरोधातील याचिका फेटाळली; मोहोळमधील विरोधकांना इंदापुरातून रसद 

राजकुमार थोरात 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

यशवंत माने हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोहोळचे आमदार झाले. मात्र, माने यांच्या इंदापूर तालुक्‍यातील राजकीय विरोधकांना हे पचनी पडले नाही.

वालचंदनगर (जि. पुणे) : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार यशवंत माने यांचे जातीचे प्रमाणपत्र बनावट व खोटे असल्याचा आरोप करून दाखल करण्यात आलेली याचिका बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळून लावली. त्यामुळे आमदार यशवंत माने यांना दिलासा मिळाला आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील शेळगावचे रहिवासी आणि इंदापूर बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने यांनी मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 2019 ची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळविला होता. मोहोळ विधानसभा मतदार संघ राखीव आहे.

निवडणुकीच्या वेळी माने यांनी अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र, ते प्रमाणपत्र बुलडाणा येथील जात प्रमाणपत्र समिती व सरकारची फसवणूक करून घेतलेले आहे. शेळगाव येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक विद्यालयातून 2009 मध्ये यशवंत माने यांनी खोटा व बनावट दाखल देवून समितीची फसवणूक केली आहे. त्यामुळे माने यांचा जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी त्यांच्याविरोधातील पराभूत उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचा मुलगा सोमेश क्षीरसागर यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. 

राज्य सरकारच्या अनुसूचित जातीच्या प्रचलित यादीत कैकाडी ही जात अनुक्रमांक 28 वर नमूद असून अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात अनुसुचित जातीच्या यादीत समाविष्ठ आहे. यशवंत माने यांना जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्राचा दाखला योग्य असल्याचा निदर्शनास आल्याने समितीने क्षीरसागार यांची तक्रार फेटाळून लावली आहे. 

कुरघोडीचे राजकारण 

इंदापूर तालुक्‍यातील शेळगावचे उद्योजक यशवंत माने हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोहोळचे आमदार झाले आहेत. मात्र, माने यांच्या इंदापूर तालुक्‍यातील राजकीय विरोधकांना हे पचनी पडले नाही. माने यांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण इंदापूर तालुक्‍यातूनच सुरु आहे. मोहोळ तालुक्‍यातील तक्रारदारांना माहिती व कागदपत्रे देवून तक्रार करण्यास भाग पाडले जात आहे. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. मात्र, माने यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र खरे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख