चंद्रकांत पाटील बहुधा केंद्रात मंत्री होणार असतील : अजितदादांचा टोला

ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत असेल.
Chandrakant Patil will probably be made a minister at the Center : Ajit Pawar
Chandrakant Patil will probably be made a minister at the Center : Ajit Pawar

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रामध्ये मंत्री करणार असतील, तर मला माहीत नाही, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांना लगावला. चंद्रकांतदादांनी देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना ‘मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या दोन दिवसांत काय होईल, ते तुम्हाला दिसेल,’ असे विधान केले होते. त्यावरून अजितदादांनी पाटलांना हा टोला लगावला. (Chandrakant Patil will probably be made a minister at the Center : Ajit Pawar)

आमदार पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून पुन्हा विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या संदर्भात पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी माझ्या कामावर लक्ष देतो. पाटील यांना केंद्रात मंत्री करणार असतील, तर मला माहीत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत असेल. मी विकास कामांना प्राधान्य देतो. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे. राज्यावर सध्या कोरोनाचे सावट आहे. याबाबत खबरदारी त्याघेत विकासकामांकडे लक्ष देण्यात येत आहे.’ 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपचे आजी-माजी सहकारी एकत्रित आल्यास ते भावी होतील, असे वक्तव्य केले. त्यांच्या ‘भावी सहकारी’च्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरउपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावे आणि काय नाही, हे मी कसे ठरवणार? तो त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात काय असते, हे मी कसे ठरवू शकतो? माझ्याशी चर्चा करताना त्यांची स्पष्ट भूमिका असते. राज्याला पुढे कसे घेऊन जायचे, जनतेची सुरक्षितता आणि सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना सोबत घेऊन जायचे. तसेच, जातीय सलोखा ठेवण्याबाबत आमची चर्चा होते.’ 

त्यांना मी बोलू शकत नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोथरूड येथील सायकल रॅलीच्या कार्यक्रमात एका स्पर्धकांचा मास्क स्वतःहून काढला. कोरोनाची परिस्थिती असतानाही मास्क काढल्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पवार म्हणाले, ‘ते महामहीम आहेत. त्यांनी काही केले तर त्यावर मी बोलू शकत नाही.’ राज्यपाल आज सकाळी सहा वाजता कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावर ‘मलाही त्यांचीच सवय लागलीय,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. 

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका लेखातून भाजपशी युती करण्याचे सूतोवाच केले आहे. या संदर्भात पवार म्हणाले, त्यांनी त्याबाबत काय भूमिका घ्यावी, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. ‘काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने काम करीत असतात. परंतु अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती किंवा आघाडी करावी. तसे त्यांच्या मनात असेल.’ 
 
अन्‌ अजित पवारांनी आपली चूक सुधारली

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत नगरपंचायतीच्या वॉर्ड रचनेबाबत निर्णय झाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्डरचना कशी असावी, याबाबत पुढील बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, पवार यांनी या वेळी खडसेंचा उल्लेख नगरविकास मंत्री म्हणून केला. परंतु ही बाब लक्षात येताच त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिंदे...शिंदे असे म्हणत त्यांनी त्यावर पडदा टाकला. 

पुण्याच्या विमानतळाचे काय

नवी मुंबई विमानतळासाठी २०२४ ची डेडलाईन दिली आहे. परंतु पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत अद्याप हालचाली दिसत नाहीत. त्यावर पवार यांनी विमानतळासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि पुण्यात विमानतळ करून दाखवणारच, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com