उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारविरोधात थोपटले दंड!

या बॅंकांमधील अर्थव्यवस्था स्वतःच्या ताब्यामध्ये यावी, या उद्देशाने केंद्र प्रयत्न करीत आहे.
Central government's increased interference in co-operative banks: Ajit Pawar
Central government's increased interference in co-operative banks: Ajit Pawar

माळेगाव (जि. पुणे) : शेतकऱ्यांसह लहानमोठ्या उद्योजकांना अर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी बारामती दूध संघ, पुणे जिल्हा बॅंकेसारख्या अग्रगण्य सहकारी संस्था मोलाचे योगदान देतात, याचे उत्तम उदाहरण खरेतर पुणे जिल्ह्यात दिसते. विशेषतः पुणे जिल्हा बॅंकेसारख्या अग्रगण्य सहकारी संस्थांच्या स्वायत्तेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणामुळे सहकारी बॅंक चालविण्याचा अधिकारच कमी होताना दिसतो.  त्यामुळेच आम्ही बॅंकांच्या कारभारामधील केंद्र सरकारचा नको तेवढा हस्तक्षेप टाळण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सांगितले. (Central government's increased interference in co-operative banks: Ajit Pawar)

बारामती सहकारी दूध संघाने शहरातील खंडोबानगर येथे नव्याने उभारलेल्या नंदन पेट्रोल पंप, सीएनजी गॅस पंप व नंदन मिल्क पार्लरचे उद्‌घाटन आज (ता. १८ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी केंद्र सरकारविरुद्धची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळेगाव साखर कारखान्याचे प्रमुख बाळासाहेब तावरे होते. या वेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सोमेश्वर कारखान्याचे पुरुषोत्तम जगताप, छत्रपती कारखान्याचे प्रशांत काटे, संभाजी होळकर, मदनराव देवकाते,  श्रीधर ताम्रपर्णी, सचिन सातव, योगेश जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र रायकर, प्रमोद काकडे, दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन ढोपे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, केंद्र सरकारचा सहकारी वित्तीय संस्थांच्या कारभारामध्ये  नको तेवढा हस्तक्षेप वाढल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आणून देताना पवार म्हणाले, महाराष्ट्रात पहिल्या पाच बॅंकांमध्ये पुणे जिल्हा सहकारी बॅंक, सातारा बॅंकेचा समावेश होतो. असे असताना या बॅंकांमधील अर्थव्यवस्था स्वतःच्या ताब्यामध्ये यावी, या उद्देशाने केंद्र प्रयत्न करीत आहे. पण, त्यामध्ये कायदे तज्ज्ञानांच सल्ला, सरकारच्या सहकार विभागाच्या मदतीने केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध कसे जायचे याबाबत गांभीर्याने विचार करतो आहे. 

बारामती दूध संघ हा सहकारी तत्वावर चालतो, तरीही हा संघ खासगी सोनाई, रियल डेअरी यांसारख्या खासगी प्रकल्पांच्या दराशी स्पर्धा करतो.  बारामतीच्या दूध उत्पादकांना खासगी संस्थांच्या तुलनेत अधिकचे दोन पैसे देण्यासाठी संघ प्रशासन सातत्याने प्रसत्न करीत आहे. त्यामध्ये नंदन मिल्क पार्लरसारखे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प, तसेच पेट्रोल पंप, गॅस पंपासारखे नवे व्यवसाय उभारले आहेत. यापुढे संघाच्या वतीने पशुखाद्य कारखान्याचे महत्वकांक्षी विस्तारीकरण हाती घेण्यात येणार आहे.  तसेच, दूध पावडर प्लॅंटचा नवीन प्रकल्प उभारण्याचाही मानस आहे. दूध संघाच्या प्रगतीमध्ये आजवरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकारी व कामगारांचाही वाट खूप महत्वाचा ठरतो, अशी माहिती पवार यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी केले, तर संचालक तानाजी खोमणे यांनी आभार मानले. 
 
सामान्यांसाठी आम्ही रात्रीचा दिवस करीत आहोत

कोरोनातून लोकांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी शिवसेनेचे नेते व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे सरकार मनापासून काम करीत आहेत. शेवटी सामान्य माणसाच्या जगण्यासाठी, त्याच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम सरकारचे आहे. ते करण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस एक करीत आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com