पुन्हा सोलापूरचा नाद केला नाही पाहिजे, अशी अद्दल घडवू ः निंबाळकरांचा अजित पवारांना टोला

खासदार झाल्यानंतरच त्यांचा हा पाणीचोरीचा कारनामा मी उघड केला होता.
BJP MP Ranjit Singh Naik Nimbalkar criticizes Ajit Pawar over Ujani water
BJP MP Ranjit Singh Naik Nimbalkar criticizes Ajit Pawar over Ujani water

पंढरपूर : नीरा देवघर धरणाबरोबरच आता उजनीचं पाणी चोरण्याचा डाव बारामती आणि इंदापूरकरांनी आखला आहे. पण, त्यांचा हा डाव उधळवून लावू, असा इशारा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी (ता. २७ एप्रिल) ‘सरकारनामा’शी बोलताना दिला.

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयावरुन सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. उजनीतून इंदापूरला पाणी देण्यावरुन सरकार विरुध्द शेतकरी असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विविध शेतकरी संघटनांबरोबरच आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. यामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही उडी घेत थेट बारामतीकरांवर निशाना साधला आहे.

खासदार निंबाळकर म्हणाले की, नीरा देवघर धरणाचे दुष्काळी सांगोला, माळशिरस आणि पंढरपूरच्या काही भागाला मिळणारे पाणी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन स्वतःच्या बारामतीकडे वळवले होते. अनेक वर्षे त्यांचा हा कारनामा सुरु होता. खासदार झाल्यानंतरच त्यांचा हा पाणीचोरीचा कारनामा मी उघड केला होता. दुर्दैवाने राज्यातील भाजपचे सरकार गेल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुष्काळी भागासाठी दिलेलं  नीरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवले. त्यानंतर आता सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी नेण्याचा घाट घातला आहे.

हा निर्णय दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्यणाला माझा आणि भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे. जोपर्यंत सरकारकडून हा निर्णय रद्द केला जात नाही, तोपर्यंत रस्त्यावर उतरुन लढाई लढण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी साथ द्यावी. भक्कम साथ मिळाली तर बारामतीकरांचा पाणी चोरीचा डाव उधळवून लावू. पुन्हा सोलापूर जिल्ह्याचा नाद केला नाही, पाहिजे अशी अद्दल घडवू, असा टोलाही खासदार निंबाळकर यांनी अजित पवारांना लगावला.

इंदापूरासाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा; अन्यथा  सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही खासदार निंबाळकरांनी दिला. खासदार निंबाळकरांच्या या इशारामुळे सोलापूर जिल्ह्यात पाणीप्रश्नावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com