दादा पाटील फराटे, सुधीर फराटेंना मोठा धक्का; सहकारी संस्थांची निवडणूक लढविण्यास बंदी  - Big shock to Dada Patil Farate, Sudhir Farate; banned from contesting Co-operative society elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

दादा पाटील फराटे, सुधीर फराटेंना मोठा धक्का; सहकारी संस्थांची निवडणूक लढविण्यास बंदी 

नितीन बारवकर 
मंगळवार, 16 मार्च 2021

या दोघांबरोबरच या दोन्ही पक्षांसाठी हा मोठा धक्का आहे. 

शिरूर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला शिरूर तालुक्‍यात मोठा धक्का बसला असून या दोन्ही पक्षाच्या तालुका अध्यक्षांना आगामी पाच वर्षांत कुठल्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविता येणार नाही. भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांचे मांडवगण फराटा सहकारी सोसायटीचे संचालकपद थकबाकीमुळे विभागीय सहनिबंधकांनी रद्द केले आहे. यातील दादा पाटील यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद; तर सुधीर फराटे यांनी संचालकपद भूषविलेले आहे. त्यामुळे या दोघांबरोबरच या दोन्ही पक्षांसाठी हा मोठा धक्का आहे. 

शिरूरच्या सहायक निबंधकांकडे मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक महादेव फराटे व राजाराम शितोळे यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये दादा पाटील फराटे, सुधीर फराटे आणि शहाजी फराटे व तुकाराम थोरात यांच्याविरोधात एक तक्रार केली होती. 

शरद सहकारी बॅंकेची दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांच्याकडे थकबाकी असून मांडवगण सोसायटीचे तर शहाजी फराटे व तुकाराम थोरात हे थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांचे सोसायटीचे संचालकपद रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर थकबाकी नसल्याचा दाखला दादा पाटील व सुधीर फराटे यांनी सहायक निबंधकांकडे सादर केला होता. त्यामुळे सहायक निबंधकांनी तो तक्रारी अर्ज फेटाळून लावत त्यांचे पद कायम ठेवले होते. 

महादेव फराटे व राजाराम शितोळे यांनी सहायक निबंधकांच्या या निर्णयाविरोधात पुणे विभाग सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकांकडे आठ मे 2018 रोजी अपिली अर्ज केला होता. "संबंधितांविरोधात तक्रार ज्या दिवशी दाखल केली, त्यादिवशी ते संचालक थकबाकीदार होते,' हे त्यांनी पुराव्यानिशी सहनिबंधकांना दाखवून दिले. यावर अंतिम सुनावणी 24 फेब्रुवारी 2021 रोजी झाली. विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी चार मार्च रोजी शिरूरच्या सहायक निबंधकांचा निर्णय रद्द करून दादा पाटील फराटे, सुधीर फराटे आणि इतर संचालकांचे पद पाच वर्षांसाठी रद्द केले. शिरूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महादेव फराटे व राजाराम शितोळे यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. 

निकाल एकतर्फी; उच्च न्यायालयात जाणार : फराटे 

कोणत्याही स्वरूपाची थकबाकी आमच्याकडे नसल्याचा दाखला आम्ही तक्रार दाखल झाल्यानंतर शिरूरच्या सहायक निबंधकांकडे सादर केला होता. त्यानंतर त्यांनी आमच्या विरोधातील तक्रार फेटाळून लावली होती. त्यानंतरच्या घडामोडीबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. शिरूरच्या सहायक निबंधकांच्या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपिल करण्यात आले असेल तर आम्हाला गेल्या दोन वर्षांत कोणतीही नोटीस अथवा पत्र आलेले नाही. आमचे म्हणणे ऐकून न घेता निकाल देण्यात आलेला असेल तर तो एकतर्फी आहे. तो आम्हाला कदापि मान्य असणार नाही. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे शिरूर तालुका भाजप अध्यक्ष दादा पाटील फराटे आणि शिवसेनेचे शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख