भोर (जि. पुणे) : पंचायत समितीच्या सभापतिपदावरून निर्माण झालेला भोर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वाद आणखी वाढला आहे. राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिवसेना आणि कॉंग्रेसची मदत घेऊन सभापती झालेल्या (पक्षाची बदनामी होऊ नये; म्हणून राष्ट्रवादीच्या दोघांनी अखेर जाधव यांनाच मतदान केले) दमयंती जाधव आणि त्यांना सूचक असलेले माजी सभापती श्रीधर केंद्रे यांच्यावर पक्षाचा व्हीप डावलल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवडणुकीत सभापतिपदासाठी पक्षाने उमेदवारी जाहीर केलेले लहू शेलार आणि माजी सभापती मंगल बोडके यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांनीही याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंचायत समिती सदस्य शेलार आणि माजी सभापती बोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेलार यांनी सांगितले की, सभापती निवडीसाठी राष्ट्रवादीकडून माझ्या नावाचा व्हीप आलेला होता. तरीदेखील दमयंती जाधव यांनी पक्षादेश डावलून सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. त्यावर श्रीधर किंद्रे यांनी सूचक म्हणून सही केली होती. म्हणून त्यांच्यावर आणि त्यांना सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवरही वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही मनात आणले असते, तर सभापतिपद हे दुसऱ्या पक्षाकडे गेले असते. परंतु आम्ही पक्षाशी निष्ठा ठेवून पक्षाची बदनामी होऊ नये; म्हणून त्यांना सहकार्य केले. याची जाणीव पक्षश्रेष्ठींनी ठेवून सभापतींचा राजीनामा घ्यावा आणि मला न्याय द्यावा, अशी मागणी केल्याचे शेलार यांनी सांगितले.
लहू शेलार आणि तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांच्या मागणीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नेमकं काय झालं होतं?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भोर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी लहू शेलार यांच्या नावाचा व्हीप काढला होता. पण, दमयंती जाधव यांनी बंडखोरी करत सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादीचे सदस्य श्रीधर किंद्रे हे सूचक होते. पक्षाची बदनामी होऊ नये; म्हणून अखेर शेलार व बोडके यांनी जाधव यांना मतदान केले. मात्र या प्रकरणामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्या वेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, माजी सभापती श्रीधर किंद्रे, राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य लहू शेलार, मंगल बोडके, कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य रोहन बाठे व शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे उपस्थित होत्या.
सहा सदस्य असलेल्या पंचायत समितीमध्ये सभापतिपदासाठी शेलार, जाधव व पूनम पांगारे यांनी अर्ज दाखल केले होते. हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेत दमयंती जाधव यांना सहा मते मिळाली. पूनम पांगारे व लहू शेलार यांना प्रत्येकी शून्य मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी जाधव यांना विजयी घोषीत केले.
सभापतिपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या सर्वांनी एकमताने उमेदवाराची निवड केल्याने पंचायत समितीमध्येही महाविकास आघाडी दिसून आली.

