दंड थोपटण्याची एवढीच हौस होती, तर निवडणुकीचे मैदान सोडून पळ का काढला? - Bhagirath Bhalke criticizes MLA Prashant Paricharak | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

दंड थोपटण्याची एवढीच हौस होती, तर निवडणुकीचे मैदान सोडून पळ का काढला?

भारत नागणे
सोमवार, 3 मे 2021

तुमचा दंड थोपटण्याचा क्षण बघण्याची जनतादेखील वाट बघतेय.

पंढरपूर : दंड थोपटण्याची एवढीच हौस होती, तर निवडणुकीचे मैदान सोडून पळ का काढला, असा सवाल करत आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वतः लढा आणि मग थंड थोपटा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार भगिरथ भालके यांनी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकांना आज सोमवारी, ता.3 मे) दिले. त्यानंतर आता भालके-परिचारक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी (ता. 2 मे) जाहीर झाला. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव केला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आवताडे आणि आमदार परिचारक यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दंड थोपटा अशी आमदार परिचारकांना साद घातली. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारकांनीही कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहात दंड थोपटले. आमदार परिचारकांनी दंड थोपटल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. यावरून आज (सोमवारी) लागलीच पराभूत उमेदवार भगिरथ भालके यांनी आमदार परिचारकांवर निशाना साधला.

या वेळी भालके म्हणाले की, पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेने भरभरुन प्रेम केले आहे. जवळपास 1 लाख 5 हजार 717 मते देवून मला विजयाच्या जवळपास पोचवले. काही चुकांमुळे निसटता पराभव झाला आहे. तरीही न खचता, नव्या उमेदीने आजपासून लोकांच्या कामासाठी मी बाहेर पडलो आहे. झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ आणि वडीलधारी मंडळींचा सल्ला घेऊनच यापुढे मी वाटचाल करणार आहे.

आमदार प्रशांत परिचारकांनी रविवारी शिवाजी चौकात दंड थोपटून बदला घेतल्याचे दाखवून दिले आहे. हयात नसणाऱ्या एखाद्या नेत्याचा बदला म्हणून जर तुम्ही दंड थोपटणार असाल तर लोकांना ते कदापीही रुचणारे नाही. विजय कोणाचा आणि दंड कोण थोपटतयं, अशी परिचारकांची खिल्लीही त्यांनी उडवली. एवढीच जर दंड थोपटण्याची हौस होती तर निवडणुकीच्या रिंगणात येऊन दंड थोपटले असते, तर लोकांनी स्वीकारले असते. आगामी 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः या आणि मग दंड थोपटा. तुमचा दंड थोपटण्याचा क्षण बघण्याची जनतादेखील वाट बघतेय, असा सल्लावजा टोलाही भालकेंनी आमदार परिचारकांना लगावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख