कोरोनाच्या काळात दंडात्मक कारवाईने बारामतीकर नाराज - Baramati People Unhappy over Traffic Police Action | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या काळात दंडात्मक कारवाईने बारामतीकर नाराज

मिलिंद संगई
मंगळवार, 9 जून 2020

कोरोनाने आर्थिक संकटात असलेल्या बारामतीकरांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे बारामतीकर त्रस्त झाले आहेत.  वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या अनेक बारामतीकरांवर काल संध्याकाळी आणि आज पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

बारामती : कोरोनाने आर्थिक संकटात असलेल्या बारामतीकरांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे बारामतीकर त्रस्त झाले आहेत.  वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या अनेक बारामतीकरांवर काल संध्याकाळी आणि आज पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांना पाचशे रुपयांपर्यंत दंडाची रक्कम भरावी लागली. 

काल संध्याकाळी व आज सकाळी पोलिसांनी फौजफाटा उभा करुन वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला. परवाना नसलेल्यांवर पोलिसांनी दंडाची कारवाई केली. पोलिसांच्या कामाला किंवा कारवाईला कोणाचाच आक्षेप नाही.  मात्र पोलिसांनी कारवाईची जी वेळ निवडली आहे ती योग्य नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. वाहन चालविण्याचा परवाना दाखविण्यासही वेळ दिली नसल्याचा आरोप काही वाहनचालकांनी केला. विशेष म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना जेवण नेऊन देण्यासाठी मदत केली त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली, असे काहींनी सांगितले.  

वाहन चालविण्याचा परवाना बहुसंख्य जणांकडे होता. पण कोरोनाच्या काळात मुळातच बाहेर पडणे थांबले होते. अनेकांनी परवाना घरीच ठेवला होता. त्या मुळे त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. अनेकांचे उत्पन्न थांबले आहे. अशा काळात दंडात्मक कारवाई टाळायला हवी होती, असे मत काही जणांनी व्यक्त केले. या काळात पाचशे रुपयांचा दंड भरणे सुद्धा अवघड होत असल्याचे काही वाहनचालक म्हणाले. 

शहरात अनेक ठिकाणी वाहतूकीचे अनेक प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्यासाठी शक्ती खर्च करा, वाहनचालकांवर कारवाई करण्यापेक्षा याला प्राधान्य द्यायला हवे, अशी भावना काही नागरिकांनी नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर व्यक्त केली. पोलिसांनी कारवाई जरुर करावी मात्र ही वेळ योग्य नाही, असे काही वाहनचालक म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख