बारामतीत 81 जणांनी टाळले कोरोनाची लस घेणे?  - In Baramati, 81 people avoided getting corona vaccine? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

बारामतीत 81 जणांनी टाळले कोरोनाची लस घेणे? 

मिलिंद संगई 
रविवार, 17 जानेवारी 2021

लसीकरण टाळले गेले की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

बारामती : कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्‍यात घालून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे कोरोना योद्धे लसीकरणाची वेळ आली, तेव्हा मागे का राहत आहेत? असा प्रश्न आता सर्वसामन्यांना पडू लागला आहे. कारण, बारामतीत पहिल्या दिवशी शनिवारी (ता. 17 जानेवारी) दोनशे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात दोनशेपैकी 119 जणांनीच लसीकरण करून घेतले होते. मात्र, 81 जणांनी लसीकरणाचा लाभ का घेतला नाही, याचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

आपल्याला लस मिळावी; म्हणून सामान्यांची धडपड सुरू असताना बारामतीत लसीकरण टाळले गेले की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

बारामतीत शनिवारी आरोग्य विभागातील 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सायंकाळपर्यंत 119 जणांनाच लस टोचण्यात आली होती. उर्वरीत 81 जण लसीकरणासाठी आले नव्हते. महिला रुग्णालयामध्ये 52, तर सांगवीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर 67 जणांनी लसीकरण करून घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली. 

बारामतीत सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या नुसार बारामती तालुक्‍यातील 1278 शासकीय व 2200 खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोविड ऍपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. वरिष्ठ पातळीवरुन दोनशे जणांची यादी आली होती, त्यानुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी लस घेणे अपेक्षित असताना 81 जणांचे लसीकरण होऊ शकले नाही. वास्तविक नियोजन करण्यात आलेले असतानाही असे का झाले? याचीच आज चर्चा होती. 

उशिरा मेसेज मिळाल्याने असे झाले असावे 

कोरोनावरील लस सर्वांनीच घेणे अपेक्षित असताना बारामतीत 81 कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही. अनेकांना आदल्या रात्री उशीरा निरोप मिळाल्याने हे घडले असावे. या बाबत आम्ही माहिती घेत आहोत, असे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख