गावातील पराभवामुळे चिडचिड करणाऱ्या अशोक पवारांना यापुढे जशास तसे उत्तर देऊ 

गाव आपल्या ताब्यात ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी जो त्रागा केला, तो लोकशाहीत न शोभणारा आहे.
Baburao Pacharne and Pradip Kand criticize MLA Ashok Pawar
Baburao Pacharne and Pradip Kand criticize MLA Ashok Pawar

शिरूर : शिरूर हवेलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार ऍड. अशोक पवार यांचे गाव असलेल्या वडगाव रासाईतील ग्रामपंचायतीची सत्ता विरोधकांच्या ताब्यात गेल्यानंतर, गावपातळीपासून सुरू झालेल्या राजकीय वादाचे लोण शुक्रवारी (ता. 26 फेब्रुवारी) तालुकापातळीवर जाऊन पोचले. वडगावचे नवनिर्वाचीत सरपंच सचिन शेलार यांच्या विजयी जल्लोषात सहभागी झालेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह स्थानिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा आज शिरूरमध्ये निषेध नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आमदार पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. 

भाजपच्या येथील संपर्क कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वडगावचे सरपंच शेलार व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपचे नेते प्रदीप कंद, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अड. धर्मेंद्र खांडरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, भाजपचे तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळदकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, शिवसेनेचे विधानसभा संघटक वीरेंद्र शेलार, भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष उमेश शेळके, दौलतराव खेडकर, आदीनाथ पापळ, लालासाहेब ढवळे आदी यावेळी उपस्थित होते. 

प्रदीप कंद, सचिन शेलार आदींवरील गुन्हे हे आकसबुद्धीने, प्रशासनाला हाताशी धरून दाखल केले आहेत. यात तालुक्‍याच्या आमदारांचा हात असल्याचा आरोप बाबूराव पाचर्णे यांनी केला. अशोक पवारांचे नाव न घेता त्यांनी टीकेची झोड उठवली. सरपंच निवडीनंतर पदाधिकारी रासाईदेवीच्या दर्शनाला जात असताना प्रदीप कंद तेथे आले. तेव्हा जल्लोष झाला. त्याचे एवढे भांडवल करून थेट गुन्हे दाखल करायला लावणे, लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. गाव आपल्या ताब्यात ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी जो त्रागा केला, तो लोकशाहीत न शोभणारा आहे. गावाने आपल्याला नाकारल्याचे आत्मचिंतन करा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. 

गावपातळीवर झालेल्या पराभवामुळे चिडचिड करणाऱ्या आमदारांनी यापुढेही त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा प्रदीप कंद यांनी दिला. 

ते म्हणाले, वडगाव रासाई हे माझे मूळ गाव असून, आम्ही शेलार कुळातीलच आहोत. त्यामुळे माझ्या गावातील, माझ्या भावकीतील, माझा सहकारी सरपंच झाला असेल तर त्याच्या सत्कार सोहळ्याला मी जाणारच. पण त्यावरून एवढे खालच्या दर्जाचे राजकारण होईल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतील, असे वाटले नव्हते. वास्तविक आमदार पवार यांनी पराभव मान्य करून तरुणांना मोठ्या मनाने शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतू त्यांच्या कृपेमुळे आनंदाच्या क्षणी तरुण कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बसण्याची वेळ आली. गावातील पराभव त्यांना सहन झालेला दिसत नाही. सच्च्या कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होताना असले हजार गुन्हे दाखल झाले तरी डगमगणार नाही. कार्यकर्त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी यापुढेही वडगावात जातच राहणार. त्यामुळे गुन्हे दाखल होणार असतील तर त्याची पर्वा नाही, असेही ते म्हणाले. 

राज्याच्या सत्तेत एकत्र असल्याचा कुठलाही विचार न करता आमदारांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांखाली जेलमध्ये बसविले, असा आरोप सुधीर फराटे यांनी केला. ते म्हणाले, ""स्वतःच्या गावातील साठ टक्केहून अधिक जनता आपल्यावर नाराज आहे. त्यामुळेच आपल्या पॅनेलचा पराभव झाला, याचे चिंतन करण्याऐवजी स्वभावशैली प्रमाणे अशोक पवारांनी विरोधकांना खोट्या-नाट्या गुन्ह्यात अडकविले. पण हा उद्योग आता त्यांच्याच अंगलट येईल.'' 

"सरपंच-उपसरपंच निवडीनंतर आम्ही रासाईदेवीच्या दर्शनाला जात असताना काही उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. पण त्यामुळे आम्ही अशांतता निर्माण केली, गोंधळ घातला असे झालेले नाही,'' असे वडगावचे सरपंच सचिन शेलार यांनी सांगितले. शिवाय मिरवणूक न काढण्याबाबत प्रशासनाने आम्हाला कुठलीही नोटीस बजावलेली नव्हती, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com