त्या कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलिस निरीक्षक तावसकरांची मुख्यालयात बदली 

तीकथितऑडिओ क्लिप व्हायरल करणारा कर्मचारीही आता जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या रडारवरआहे.
That audio clip led to the transfer of police inspector Tavaskar to the headquarters
That audio clip led to the transfer of police inspector Tavaskar to the headquarters

शिक्रापूर (जि. पुणे)  ः शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांची कथित वाद्‌ग्रस्त संभाषण प्रकरणी पोलिस मुख्यालयात बदली झाली आहे. पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचा आदेश देऊन तावसकर यांची बदली २३ तारखेला केली आहे. दरम्यान, ज्यांनी हे वाद्‌ग्रस्त संभाषण व्हायरल केले, त्यांचीही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

कोरोनामुळे महिनाभर सुटीवर गेलेले पोलिस निरीक्षक उमेश तावसकर हे ता. १९ एप्रिल रोजी डयूटीवर हजर झाले होते. त्यावेळी ते त्याच रात्री दैनंदिन हजेरीच्या वेळी काही फुटीर कर्मचाऱ्यांबद्दल आणि एका राजकीय व्यक्तीबद्दल असभ्य भाषेत बोलले होते. हे संभाषण या हजेरीच्या वेळी हजर असलेल्या एकाने सोशल मीडियावर व्हायरल केले.

तावसकर हे त्या राजकीय व्यक्तीबद्दल तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल असभ्य भाषेत बोलल्याचा दावा त्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपच्या आधारे करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित राजकीय व्यक्तीने याबाबतची तक्रार विशेष पोलिस महासंचालक मनोज लोहिया यांच्याकडे ता. २० एप्रिल रोजी केली होती. 

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तत्काळ कारवाई करीत तावसकर यांचा शिक्रापूरचा पदभार काढून घेवून त्यांना मुख्यालयात रुजू करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांची नियुक्ती करुन तक्रारदार राजकीय व्यक्ती, त्यांचा परिवार तसेच काही साक्षीदार यांचे तसेच १९ तारखेला हजर सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या तावसकर यांच्यावर कारवाई झाली असली तरी शासकीय गोपनीयतेचा भंग नेमका कुणी केला, याची चौकशीही खात्यांतर्गत सुरू करण्यात आली आहे. ती ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा कर्मचारीही आता जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या रडारवर असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

वाळू, एमआयडीसी बीटवरील कर्मचाऱ्यांची उचलबांगडी 

पोलिस निरीक्षक तावसकर यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात सहा महिन्यांपूर्वी हजर होताच वाळू, एमआयडीसी स्र्कॅप आणि गोपनीय बीटसह पाबळ व तळेगाव चौक्यांमध्ये गेली अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही मोठे फेरबदल केले होते. त्यामुळे शिक्रापूर पोलिस ठाण्यात मोठा गदारोळ होण्याचे संकेत वारंवार मिळत होते. त्यातूनच १९ तारखेची ती कथित ऑडिओ क्लिप बाहेर आली. त्यातून पाहिली कारवाई मात्र तावसकर यांच्यावरच झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com