मला शिवसेनेत घेणारे सोनवणे कोण? : आशा बुचकेंचा हल्लाबोल  - Asha Buchke criticizes former MLA Sharad Sonawane | Politics Marathi News - Sarkarnama

मला शिवसेनेत घेणारे सोनवणे कोण? : आशा बुचकेंचा हल्लाबोल 

रवींद्र पाटे 
मंगळवार, 20 जुलै 2021

शिवसंपर्क अभियान निमित्ताने माजी आमदार सोनवणे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद गटात मेळावे घेतले.

नारायणगाव : शिवसंपर्क अभियाना निमित्ताने जिल्हा प्रमुख, माजी आमदार शरद सोनवणे  (Sharad Sonawane) यांनी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके (Asha Buchke) यांना पुन्हा माघारी फिरा, शिवसेनेत या असा सल्ला दिला होता. सोनवणे यांची ही ऑफर बुचके यांनी फेटाळली आहे. उलट पक्ष निष्ठा नसलेले, काळा कारभार करून माझी शिवसेनेतुन हकालपट्टी करण्यास कारणीभूत असलेले मला शिवसेनेत घेणारे हे कोण, असे माजी आमदार शरद सोनवणे यांना त्यांनी सुनावले आहे. (Asha Buchke criticizes former MLA Sharad Sonawane) 

शिवसंपर्क अभियान निमित्ताने माजी आमदार सोनवणे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद गटात मेळावे घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी बाजार समिती निवडणुका बाबत चाचपणी केली. या वेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख माऊली खंडागळे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, उपजिल्हा प्रमुख संभाजी तांबे, मंगेश काकडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, सरपंच योगेश पाटे आदी पदाधिकारी होते.

हेही वाचा : मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी. पाडवींचा फडणवीसांना इशारा

शिवसंपर्क अभियाना निमित्ताने नारायणगाव येथील सभेत माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे यांनी 'जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना परत शिवसेनेत घ्या; अन्यथा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला तालुक्यात एकही जागा मिळणार नाही,' असे सुनावले होते. याच कार्यक्रमात सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके, खासदार डॉ. अमोल कोल्हे , सभापती संजय काळे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करून आगामी निवडणुका स्वबळावर लढू; राष्ट्रवादी काँग्रेसला गाडून टाकू अशी कडवी टीका केली होती. पण, याचवेळी त्यांनी 'उद्धवसाहेबांचा सांगावा आहे, आशाताई तुम्ही वेळीच माघारी फिरा,' असे आवाहन केले होते. 

माजी आमदार सोनवणे यांनी दिलेलीही ऑफर नाकारून जिल्हा परिषद सदस्या बुचके यांनी तुम्ही मला पक्षात घेणारे कोण आशा शेलक्या शब्दात त्यांना सुनावले. ज्यांच्या काळ्या कारस्थानामुळे माझी शिवसेनेतुन हकालपट्टी झाली. सांगावा सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. या वलग्ना त्यांनी पुन्हा करू नये. मी कोणत्या पक्षात जायचे हा अधिकार माझ्या कार्यकर्त्यांचा आहे. 

हेही वाचा : सरकार पडेल असे रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

विधानसभा निवडणुकीत तीन वेळा माझा पराभव झाला. पक्षाकडे कोणतेही पद न मागता दुसऱ्या दिवशी मी कार्यकर्ता म्हणून जनतेच्या सेवेत रुजू झाले. मात्र, पराभवामुळे काही वैफल्यग्रस्त झाले आहेत. बुचके म्हणाल्या मी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कन्या असून ते माझ्या हृदयात आहेत. मी शिवसेना सोडली नाही तर माझी हकालपट्टी करण्यास पक्ष प्रमुख उद्धव साहेब यांना भाग पाडले. आजही माझे नेते उद्धव साहेब आहेत. माझा व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान ठेऊन मातोश्रीतून सांगावा आल्यास, उद्धव साहेबांनी हाक दिल्यास शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यास मी सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख